अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-केंद्र सरकारने 1 मेपासून लसीकरणासाठीचा तिसरा टप्पा सुरू करण्याची घोषणा केली आहे. लसीकरणासाठीचं रजिस्ट्रेशन आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून सुरू झालं.
परंतु कोविन अॅपवर रजिस्ट्रेशन सुरू होण्याच्या काही मिनिटांतच कोविन अॅपचा सर्व्हर क्रॅश झाला. या पोर्टलवर नोंदणी करताना सुरुवातीला मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागतो. त्यानंतर एक ओटीपी त्या मोबाईल नंबरवर पाठवला जातो,
मात्र हा ओटीपी येत नसल्याचं समोर आलं आहे. तसेच अनेक यूजर्सनी साईट ओपन होत नसल्याच्या देखील तक्रारी केल्या आहेत. 18 वर्षांवरील नागरिकांना लस घेण्यासाठी कोविन ऍप, उमंग ऍप आणि आरोग्य सेतूवर नोंदणी करणे बंधनकारक आहे.
आज संध्याकाळी 4 वाजेपासून या वेबसाईटवर रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली. पण अवघ्या काही मिनिटांतच वेबसाईट आणि ऍप क्रॅश झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं अनेकांची पंचाईत झाली आहे.
राज्यात 1 मे पासून लसीकरण नाहीच :- राज्यातील लसीकरण 1 मे पासून सुरू करता येणार नसल्याचं आरोग्यमंत्र्यांनी आधीच सांगितलं आहे. मात्र त्याच्या नोंदणीसाठी सुरुवात झाली आहे. लसीकरणाच्या ठिकाणी गोंधळ होऊ नये यासाठी नोंदणी करूनच लस घेण्यासाठी जावं.
थेट केंद्रावर गेल्यास लसीकरण होणार नसल्याचं टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र आता सर्वरच डाऊन असल्याने दाद कोणाकडे मागावी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. दरम्यान जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरुवात झाली.
सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस,
नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली गेली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|