गावात दहशतीने वहिवाटीचा रस्ता बंद रस्ता खुला करुन देण्याची पिडीत दिव्यांगाची मागणी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:-  मौजे रूपेवाडी (ता. पाथर्डी) गावात दहशतीने दिव्यांग व्यक्तीच्या घराकडे जाणारा वहिवाटीचा रस्ता बंद करण्यात आला असून, सदर रस्ता खुला करुन रस्ता अडविणार्‍या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी तक्रारदार पिडीत दिव्यांग पोपट केरु शेळके यांनी केली आहे.

या मागणीचे निवेदन शेळके यांनी पाथर्डी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. दहा दिवसात सदर रस्ता खुला होऊन संबंधितांवर कारवाई न झाल्यास पाथर्डी पंचायत समितीसमोर उपोषण करण्याचा इशारा पिडीत दिव्यांग शेळके यांनी दिला आहे.

मौजे रूपेवाडी (ता. पाथर्डी) गावात पोपट केरु शेळके यांच्या घराकडे जाणारा वहिवाटीचा रस्ता 24 मे रोजी गावातील काही समाजकंटकांनी बंद केला होता. सदर प्रकरणी तक्रार अर्ज केल्यानंतर ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांनी तोंडी समज देऊन हा रस्ता दोन वेळेस खुला करून दिला होता.

परंतु ठोस अशी कारवाई केली नसल्याने हा रस्ता बाबासाहेब खंडू मोहिते व कांताबाई बाबासाहेब मोहिते यांनी अवैधरीत्या पुन्हा मुरुमचे वळन टाकून बंद केला आहे. हा रस्ता गाव नकाशाप्रमाणे दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणार आहे.

सदर रस्ता घोडेगाव-मिरी मेन रोडला जोडणारा आहे. उत्तरेकडील लोहारवाडी व चांदा या गावांना जोडणारा हा रस्ता आहे. याच रोडचे संपूर्ण उत्तरेकडील गावे, वस्त्या दळणवळण करतात.

रस्ता बंद केल्यामुळे उत्तरेकडील नागरिकांची आरोग्याची, शेती उद्योगधंद्याची व दुग्ध व्यवसायाचे मोठे नुकसान होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दिव्यांग शेळके यांनी मोहिते कुटुंबियांना सदर रस्ता खुला करुन देण्याची विनंती केली असता, त्यांनी धमकावून शारीरिक दिव्यांगाची चेष्टा केली.

सदर रस्ता बंद असल्याने शारीरिक त्रास सहन करुन गावात गाडी लाऊन घरा पर्यंत पर्यायी मार्गाने जावे लागत आहे. मोहिते यांनी दिव्यांग हक्काचा भंग केला असून, त्यांच्यावर दिव्यांग अधिनियम 2016 नूसार कारवाई होणे अपेक्षित आहे.

रस्ता बंद करण्यासाठी जो मुरुम टाकण्यात आला आहे. तो देखील अवैध गौण खनिज उत्खनन करुन टाकण्यात आला आहे. शासनाची रॉयल्टी न भरता व अवैध रित्या रस्त्यावर टाकून वहिवाटीचा रस्ता बंद करण्यात आला आहे.

सरपंच व ग्रामसेवक यांना सदर प्रकरण सांगितला असता राजकारणाच्या आकसापोटी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. गेल्या तीन महिन्यापासून मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गुंडगिरी व दहशतीने हा रस्ता बंद करण्यात आला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

बंद करण्यात आलेला वहिवाटीचा रस्ता खुला करुन रस्ता अडविणार्‍या समाजकंटकांवर कारवाई करावी, रस्ता बंद करण्यासाठी अवैध गौण खनिजचे उत्खनन व वाहतूक करणार्‍यावर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे दिव्यांग शेळके यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!