अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मदतीने राजकीय खेळ्या करून अहमदनगर जिल्हा सहकारी बँक ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे.
दरम्यान जिल्हा बँकेच्या पदाधिकाऱ्यांची आज महसूलमंत्र्यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली. यामध्ये जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी पारनेरचे राष्ट्रवादीचे उदय शेळके तर उपाध्यक्षपदी संगमनेरचे काँग्रेसचे माधवराव कानवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
दरम्यान या निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि मधुकर पिचड यांची यामुळे सहकारात चांगलीच कोंडी झाली आहे.
अध्यक्षपदी निवड झालेले शेळके उपमुख्यमंत्री पवार यांचे समर्थक आहेत, तर उपाध्यक्ष कानवडे थोरातांचे समर्थक आहेत. दोघांनाही सहकार क्षेत्राचा आणि बँकेचा मोठा अनुभव आहे.
पदाधिकाऱ्यांची निवड बनविरोध झाली असली तरी संचालक मंडळाच्या निवडीवेळी २१ पैकी १७ जागा बिनविरोध झाल्या. तर चार जागांसाठी चुरशीची निवडणूक झाली.
ज्या पारनेर तालुक्यातील निवड विखेंनी प्रतिष्ठेची केली होती, तेथूनच निवडून आलेल्या शेळके यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली.
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या विखे व पिचड यांना शह देण्यासाठी बँकेच्या निवडणुकीत राजकीय डावपेच खेळण्यात आले.
व या डावपेचामध्ये थोरात यशस्वी देखील झाले आहे. बँकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीसह थोरातांना मानणारे भाजपमधील नेते यांची सत्ता राहणार आहे. यातून विखे आणि पिचड यांच्या सहकारी संस्थांची कोंडी केली जाण्याची शक्यता आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|