अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:- शिवजयंतीच्या निमित्ताने महाविकास आघाडी सरकारने केलेले नियम हे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का पोहचविणारे आहेत. सरकारने फार प्रतिष्ठेचा विषय न करता ही नियमावली तातडीने मागे घ्यावी अशी मागणी भाजपाचे जेष्ठनेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
राज्यातील शेतक-यांकडून दहशतीने सुरु असलेली विज बिलांची वसुली ही चिड निर्माण करणारी असून, पूजा चव्हाण आत्महत्ये प्रकरणात सरकार मंत्र्यांना पाठीशी घालतयं का असा प्रश्नही उपस्थित केला.
लाचारी पत्करुन सत्तेत राहण्यापेक्षा बाहेर पडून आपली ताकद दाखवा असा सल्लाही त्यांनी कॉंग्रेसला दिला. आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना शिवजयंतीच्या निमित्ताने आघाडी सरकारने केलेल्या नियमावलीवर सडकून टिका केली.
राज्यात मंत्र्यांचे दौरे मोकाटपणे सुरु आहेत, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या पदभार सोहळ्यालाही गर्दी झालेली चालते तिथे मात्र कोणतेही नियम नाहीत. महाविकास आघाडी सरकारने नियमावली तयार करुन एक प्रकारे राज्याच्या अस्मितेलाच धक्का देण्याच काम केले असून, ज्यांच्या आशिर्वादाने आणि ज्यांचे नाव घेवून महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले, त्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला मात्र नियमावली तयार होते हे महाराष्ट्राच्या दृष्ट्रीने अतिशय धक्कादायक आणि चिड आणणारी बाब आहे. सरकारने तात्काळ ही नियमावली मागे घेवून राज्यातील जनतेला शिवजयंती साजरी करु द्यावी असे आवाहन त्यांनी केले.
ग्रामीण आणि शहरी भागात विज वितरण कंपनीने विज तोडणीचे महान काम या सरकारने सुरु केल आहे, याबद्दल नाराजी व्यक्त करुन आ.विखे पाटील यांनी सांगितले की, राज्यातील शेतकरी आगोदरच अडचणीत सापडलेले आहेत. त्यांना दिलासा देण्याची गरज असताना मात्र आघाडी सरकारने विज तोडणीच्या नोटीसा काढून शेतक-यांच्या जखमांवर मिठ चोळण्याचे काम केले आहे. आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी लोकप्रतियता मिळविण्यासाठी १०० युनिट मोफत विज देण्याची घोषणा केली होती. तुमच्याकडे काय कोणी मागायला आले नव्हते.
मोफत विज तर सोडाच पण धाक दपटशाही आणि दहशतीने सरकारने सुरु केलेली ही वसुली सरकारने तातडीने थांबवावी अशी मागणी आ.विखे पाटील यांनी केली. सरकारने ही वसूली तात्काळ थांबविली नाही तर शेतक-यांच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल असा इशारा त्यांनी दिला.
कॉंग्रेस पक्षाचे अस्तित्वच या सरकारमध्ये कुठेच दिसत नाही, त्यामुळे कॉंग्रेसने अनेक वेळा इशारे देवूनही त्यांच्या इशा-याची चिंता सरकारमध्ये कोणीही करत नाही. कॉंग्रेसचे मागील प्रदेशाध्यक्ष सरकारबद्दल एका शब्दानेही बोलले नाहीत. नवीन प्रदेशाध्यक्ष काय करतात हे माहीती नाही, मुळातच सरकारचा रिमोट शिवसेनेकडे नाही, कोणाकडे आहे हे सर्वांना माहीती आहे. सरकारमध्ये कॉंग्रेस पक्षाचे अस्तित्वच नाही, तर मंत्र्यांचे कुठे दिसणार?
असा प्रश्न उपस्थित करून, कॉंग्रेस पक्षाने आता इशारे देण्याचे काम सोडून द्यावे, एवढी लाचारी पत्करुन सरकारमध्ये राहण्याची वेळ कॉंग्रेस पक्षावर आली असेल तर त्यांनी सरळ सत्तेतून बाहेर पडले पाहीजे आणि आपली स्वत:ची ताकद दाखवून दिली पाहीजे असा सल्ला आ.विखे पाटील यांनी दिला. मंत्री मंडळातील अन्य एका मंत्र्याबद्दल समोर आलेल्या घटनेवर भाष्य करताना आ. विखे पाटील म्हणाले की, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेच्या बाबतीत चौकशी आगोदरच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्षाध्यक्षांनी करुन त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे, त्याची चौकशी आता सुरु आहे, काय बाहेर येईल हे माहीत नाही.
परंतू आता नव्याने पुजा चव्हाण हिच्या आत्महत्येबाबत शिवसेनेच्या एका जेष्ठ मंत्र्याचे नाव समोर आले आहे. त्याच्या ऑडीओ क्लिप्स राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे भारतीय जनता पक्षाने दिलेल्या आहेत. प्रसार माध्यमांनीही त्या दाखविलेल्या आहेत.
अशा बेजबाबदार मंत्र्यांना मंत्रिमंडळात ठेवता कशाला? असा प्रश्न करुन, या घटनेच्या चौकशी बाबत विरोधी समर्थन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही नेते मंडळी करीत आहेत ही बाब महाराष्ट्राच्या दृष्टीने शोभनिय नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सत्तेत राहण्यासाठी किती तडजोडी करायच्या हे आता ठरविले पाहीजे. महाविकास आघाडी सरकारने राज्याच्या अस्मितेची लफ्तर वेशिला ठांगलेली रोजच जनता पाहत आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात दोषी असलेल्या मंत्र्याचा तात्काळ राजीनामा घेवून चौकशी करावी अशी मागणी त्यांनी शेवटी केली.
जोर्वे ग्रामपंचातीचे सरपंच रविंद्र खैरे यांनी भाजपात केलेल्या प्रवेशावर आपली प्रतिक्रीया देताना आ.विखे पाटील म्हणाले की, जोर्व्याची ग्रामपंचायत ही जनसेवा मंडळाच्याच ताब्यात आहे, सरपंचही मनापासुन आमच्या बरोबर होते. काहींनी दहशत निर्माण करुन त्यांना स्वत:कडे ठेवण्याचा प्रयत्न केला गेला.
परंतू दुर्दैवाने त्यांना ते फार काळ जमले नसल्याने सरपंचानी मनापासून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. लोकशाही ही चालणारी निरंतर प्रक्रीया आहे, जेवढी तुम्ही दहशत निर्माण कराल तेवढी माणस पुढे येवून आमच्याबरोबर काम करतील असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved