अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :- कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून शैक्षणिक क्षेत्रावर चांगलाच परिणाम झाला आहे. यातच सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क, शैक्षणिक शुल्क हा मुद्दा समोर आला आहे.
आता याच मुद्यावरून भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे फी माफीबाबतची मागणी केली आहे.
मराठा आणि ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विद्यार्थ्यांची या वर्षाची शैक्षणिक फी माफ करावी, अशी मागणी भाजपा नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विखेंनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना याबाबत सविस्तर पत्र दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर तसेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर दोन्ही समाजांना दिलासा देणारे निर्णय सरकारने घ्यायला हवे होते, परंतु सरकारकडून तसे काही होताना दिसत नाही.
सरकारकडून फक्त वेळकाढूपणाचे धोरण सुरू असल्याने आता नोकरीस पात्र असणारे उमेदवार आत्महत्या करू लागले असल्याची बाब आ. विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
राज्यात आरक्षणाच्या कारणाने चिंताग्रस्त बनलेल्या विद्यार्थ्यांना आणि नोकर्यांची नियुक्ती पत्र न मिळालेल्या उमेदवारांना दिलासा देण्याच्या दृष्टीने सरकारने फी माफ करण्याचा निर्णय तातडीने करण्याची विनंती केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम