त्या’आरोपीच्या अटकेसाठी ग्रामस्थांनी ठेवले ‘गावबंद’

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :- नेवासा तालुक्यातील चांदा येथील ज्ञानदेव सोपान दहातोंडे हत्याप्रकरणातील आरोपींना आठ दिवसात अटक न झाल्यास १२ जुलै रोजी पुन्हा आंदोलन करण्यात येईल .

याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटिल यांना भेटून माहिती देणार असून, या घटनेच्या निषेधार्थ चांदा गाव शंभर टक्के बंद ठेवले होते. याबाबत अधिक माहिती अशी, येथील ज्ञानदेव सोपान दहातोंडे यांची भरचौकात हत्या होऊन महिना झाला तरी अदयाप फरार आरोपीना अटक झाली नाही तसेच गावात अवैध धंदे , गावठी कट्टे आदिचे प्रमाण वाढले असून दहशत आणि दादागिरी वाढली आहे .

पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ  गावातील सर्व पक्षांचे राजकीय पदाधिकारी व ग्रामस्थानी गेल्या आठवडयात गृहमंत्री दिलीप वळसे पाटिल तसेच नगरचे पोलिस अधिक्षक मनोज पाटिल यांना आंदोलनाचे निवेदन दिले होते .

त्यानुसार आज मंगळवारी चांदा गावबंद व निषेध सभा आंदोलन झाले, सकाळी गावातील व्यापाऱ्यांनी आपआपली दुकाने बंद ठेवली होत . यावेळी जर दि.१२ जुलैपर्यंत सदर प्रकरणाचा तपास लागला नाही तर नगर औरंगाबाद महामार्गावर घोडेगाव चौफुला येथे रस्तारोको आंदोलन करण्याचा निर्धारही या वेळी सर्वपक्षीय नेत्यांनी केला.