लग्नसमारंभात कोरोना नियमांचा भंग, वर-वधू पक्षासह मंगल कार्यालय मालकाला दंड

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- लग्नसमारंभात कोरोना नियमांचा भंग करणाऱ्या मंगल कार्यालयांना श्रीरामपूर तालुका पोलीस आणि श्रीरामपूर पंचायत समितीच्या पथकाने आज (दि.११) रोजी संयुक्त कारवाई करत दणका दिला आहे.

रोहयोचे उपायुक्त अर्जुन चिखले हे टाकळीभान येथे पाहणी दौऱ्यावर असतांना त्यांना येथील मंगल कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून त्यानंतर त्यांनी याबाबत श्रीरामपूर तालुका पोलीस व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊन कारवाई करण्याचा सूचना दिल्या.

त्यानंतर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल शाम गाडेकर,गोपनियचे अनिल शेंगाळे आणि श्रीरामपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी रावसाहेब अभंग,

भोकरचे ग्रामविकास अधिकारी प्रदीप ढुमने,भामाठानचे ग्रामविकास अधिकारी प्रदीप आसने यांनी ही कारवाई केली. सामाजिक अंतर न पाळने, ५० व्यक्तींची मर्यादा ओलांडणे, सॅनिटायझर नसणे अशा नियमांचे उल्लंघन केल्याने भोकर शिवारातील अन्नपूर्णा मंगल कार्यालयांवर कारवाई करण्यात आली आहे.

त्यांच्याकडून दहा हजारांचा दंड वसूल करण्यात आला तर वरपक्ष व वधूपक्षाकडून एक-एक हजाराचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती श्रीरामपूर तालुका पोलिसांकडून देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने श्रीरामपूर तालुका प्रशासनाने पुन्हा एकदा कारवाईला सुरवात केली आहे.

यासाठी शहर व तालुका पोलिसांनी तसेच पंचायत समितीने पथके तयार केली असून, आज पोलीस व पंचायत समितीच्या पथकाने भोकर येथील मंगल कार्यालयांवर धाड टाकली, यावेळी मंगल कार्यालय चालकांची व आयोजकांची चांगलीच धावपळ उडाली.कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या अन्नपूर्णा मंगल कार्यालयावर कारवाई करण्यात आली.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, कार्यक्रम आयोजन करण्याऱ्या संस्थांनी, मंगल कार्यालयांनी कोरोनाबाबत शासनाने ठरवून दिलेले नियम पाळले पाहिजे, योग्य ते सामाजिक अंतर ठेवावे, व्यक्तींची मर्यादा ओलांडू नये, सॅनिटायझर मशिनची व्यवस्था करावी अशा सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe