जिल्हा परिषदेच्या रुग्णवाहिकांवरून सोशल मीडियावर वॉर !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राहुरी तालुक्यासाठी पाच रुग्णवाहिका मिळाल्या; मात्र त्याच्या लोकार्पण कार्यक्रमावरून ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर चांगलीच जुगलबंदी रंगली आहे.

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वतीने राहुरी तालुक्याला पाच रुग्णवाहिका प्रदान करण्यात आल्या. उंबरे येथे एका रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

पंचायत समितीच्या दोन पदाधिकाऱ्यांना ही माहिती समजताच अधिकाऱ्यांना अनेक प्रश्न विचारून पुन्हा पंचायत समिती कार्यालय राहुरी येथे राज्यमंर्त्यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले

. या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित होताच व्हॉटस-ॲप ग्रुपवर राष्ट्रवादी व भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार जुगलबंदी रंगली. मागील १० वर्षांच्या काळात माजी लोकप्रतिनिधींनी कधी रुग्णवाहिकेच्या गाडीचा टायर बदलला नाही.

अडाणी आणि अशिक्षित लोकप्रतिनिधी व सुशिक्षित लोकप्रतिनिधी यामधील फरक जनतेसमोर आहे. असे म्हणून तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे होत असल्याचा दावा तनपुरे समर्थकांनी केला, तर कोरोनाच्या काळात ऑक्सिजन बेड, रेमडीसिविर इंजेक्शन आदी कारणांमुळे नागरिकांचे हाल झाले.

आमदार निलेश लंके यांच्याप्रमाणे एखादे मोठे कोविड सेंटर व्हायला हवे होते.जिल्हा परिषदेच्या रुग्णवाहिकेचे श्रेय घेऊ नये, असा पलटवार कर्डिले समर्थकांनी केला. राहुरी तालुक्यातील कोरोना परिस्थिती, मुळा नदीवरील बंधारे भरणे, डॉ. तनपुरे साखर कारखाना,

कामगार पेमेंट, रस्त्यांचे प्रश्न, बारागाव नांदूर रस्ता, वीज रोहित्र, बस डेपो, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा बँकेच्या माध्यमातून झालेली मदत आदी विषयांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe