अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- नगर शहरात काही दिवस झाले कि व्हॉल्व दुरुस्ती, पाईपलाईन दुरुस्तीच्या नावाखाली शहरातील नागरिकांना पाणीकपात केली जात असते.
आजही शहरातील अनेक ठिकाणी पाण्याचे हाल असलेले दिसून येत आहे. एकीकडे शहरात हि परिस्थिती सुरु असताना मात्र दुसरीकडे लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहत असल्याचा अनुभव नगरकरांना आला. महापालिकेच्या वसंत टेकडी येथे नव्याने बांधलेला जलकुंभ शुक्रवारी रिकामा करण्यात आला.
जलकुंभातील पाणी नगर- मनमाड महामार्गावर सोडून देण्यात आले होते. त्यामुळे महामार्गाला नाल्याचे स्वरुप आले होते. महापालिकेच्या अमृत योजनेंतर्गत वसंत टेकडी येथे ५० लाख लीटर क्षमतेचा जलकुंभ उभारण्यात आला आहे.
या टाकीची चाचणी करण्यात आली. दोन महिन्यांपूर्वी हा जलकुंभ पाण्याने भरला होता. तो शुक्रवारी रिकामा करण्यात आला. हे पाणी नगर- औरंगाबाद महामार्गावर सोडण्यात आले. महामार्गाच्या दोन्ही बाजूने दिवसभर पाणी वाहत होते.
त्यामुळे ठिकठिकाणी रस्ता पाण्याखाली गेल्याने पाण्याचे फवारे उडत होते. याबाबत वसंत टेकडी येथे काम करत असलेल्या ठेकेदाराच्या कामगारांकडे विचारणा केली असता जलकुंभाची चाचणी करण्यासाठी पाणी भरले होते.ते सोडून देण्यात आले आहे.
शनिवारी इनलेट आणि आऊट जोडण्यात येणार आहे. त्यासाठीची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले. जलकुंभातील पाणी रस्त्यावर सोडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. रस्त्याच्या एका बाजूने वाहतूकही ठप्प झाली होती.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम