अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- राहाता तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन तालुक्यातील आठवडे बाजार व जनावरांचे बाजार ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिले आहेत.
शनिवार दि. १३ मार्च रोजी तहसीलदार कुंदन हिरे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले, की ३१ मार्चपर्यंत तालुक्यातील सर्व गावांचे आठवडे बाजार तसेच ज्या ठिकाणी जनावरांचे बाजार भरतात, तेथील जनावरांचे बाजार बंद ठेवले जाणार आहेत. दि. १३ मार्च रोजी तालुक्यातील कोरनाचे रुग्ण संख्येचा आढावा घेण्यात आला.
यामध्ये राहाता तालुक्याच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. वाढत्या रूग्णसंख्येला आळा घालण्यासाठी व सुपर स्प्रेडर्स यांच्यावर प्रतिबंध करण्याबाबत उपाययोजना करणे अगत्याचे झाल्याने तहसिलदारांनी बाजार बंद ठेवण्याचे आदेश तालुक्यात लागू केले आहेत.
यामध्ये राहाता व शिर्डी नगरपालिका कार्यक्षेत्र तसेच संपूर्ण ग्रामीण भागात भरणारे आठवडी बाजार ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात येत आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये भरण्यात येणारे जनावरांचे बाजारसुद्धा बंद केले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा बाजूस बसणारे तात्पुरते फेरीवाले,
भाजीपाला विक्रेते याबाबत स्थानिक प्राधिकरणाने योग्य ती दक्षता घेऊन प्रतिबंध करावा, असेही या आदेशात सूचित करण्यात आले आहे. नगरपालिका हद्दीत मुख्याधिकारी व ग्रामीण भागासाठी गटविकास अधिकारी यांनी ग्रामदक्षता समितीमार्फत या आदेशाचे तंतोतंत पालन व अंमलबजावणी करावी.
आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध योग्य ती कारवाई करावी. राहाता तालुक्यातील नागरिकांनी शासकीय नियमांचे काटेकोरपणे तंतोतंत पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|