अहमदनगर Live24 टीम, 10 जुलै 2021 :- पर्यावरण संवर्धन व सदृढ आरोग्याचा संदेश देत निघालेल्या नाशिक ते पंढरपूर सायकल रॅलीचे अहमदनगर शहरात स्वागत करण्यात आले.
आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते व शिक्षक परिषदेच्या वतीने माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांनी सायकल वारीत सहभागी झालेल्या सर्व सायकलपटूंचे पोलीस मुख्यालय येथे जंगी स्वागत केले.
यावेळी पोलीस मुख्यालयाचे पो.नि. दशरथ हटकर, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक महेंद्र हिंगे, गणेश बोरुडे, सायकलपटू डॉ. आबा पाटील, संजय पवार, दत्तू मामा, भूषण राणे, विशाल शेळके, राजेंद्र कोटमे, कैलास गायकवाड, अविनाश लोखंडे, प्रवीण कोकाटे, हेमंत अपसुदे, संतोष पवार आदिंसह नगर शहरातील सायकलपटू उपस्थित होते.
डॉ. आबा पाटील प्रास्ताविकात म्हणाले की, नाशिक येथील सायकलपटू मागील आठ वर्षापासून सायकल वारी करत आहे. मागील वर्षी कोरोनाने खंड पडला. मात्र पुन्हा या वर्षी सायकलवर पांडूरंगाच्या चरणी कोरोनाचा नायनाट होण्यासाठी सायकलवारी करुन साकडे घालण्यात येणार आहे.
ही वारी करताना ठिकठिकाणी वृक्षरोपण अभियान राबविण्यात येत असून, सदृढ आरोग्यासाठी व प्रदुषण थांबविण्यासाठी नागरिकांना सायकलचा वापर करण्याचे आवाहन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, कोरोनामुळे पंढरपूरच्या वारीवर निर्बंध आले असले तरी, प्रत्येक वारकरी भक्तीभावाने विठू माऊलीची आराधना करीत आहे. आरोग्य व पर्यावरणाच्या जागृतीसाठी निघालेली सायकल वारी प्रेरणादायी आहे.
परदेशात प्रत्येक नागरिक आरोग्याकडे लक्ष देत असून, यासाठी प्रत्येक महिला, पुरुष सायकलचा वापर करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तर शहरात आमदार अरुणकाका जगताप, व संग्राम जगताप यांच्या वतीने प्रत्येक दिंडीचे स्वागत करण्यात येते. या दिंडीचे देखील शहरात स्वागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बाबासाहेब बोडखे यांनी समाजाची गरज ओळखून पर्यावरण व आरोग्याची पताका घेऊन निघालेली सायकल वारी दिशादर्शक आहे. समाजात सायकल चालविण्याकडे कमीपणाने पहाण्याचा दृष्टीकोन चुकीचा आहे. आरोग्यासाठी व प्रदुषण थांबविण्यासाठी सायकलशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.
महेंद्र हिंगे यांनी नाशिकचे शिक्षक, डॉक्टर, इंजिनीअर या सायकल वारीत सहभागी असून, हा उपक्रम स्फुर्ती देणारा असल्याचे सांगितले. आभार चंद्रशेखर मुळे यांनी मानले. पोलीस प्रशासनाचे सहकार्य मिळत असल्याचे सांगून सायकपटूंनी पोलीसांचे विशेष आभार मानले.
कोरोना नियमांचे पालन करुन सायकपटूंचे स्वागत करण्यात आले. पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात सायकलपटू रात्री मुक्कामी थांबले होते. शनिवारी सकाळी सायकलपटू पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम