अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यापासून या देशात सर्व काही बदलले आहे. येथील जास्तीत जास्त लोकांना कसेही करून देश सोडायचा आहे. अफगाणिस्तानमधून बाहेर जाण्याचा फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे काबुल विमानतळ होय.
दरम्यान, काबुल विमानतळावर जेवण आणि पाण्याचे दर गगनाला भिडले आहेत. याठिकाणी ४० डॉलर्स म्हणजेच ३,००० रुपयांना पाण्याची बाटली मिळत आहे. तर जेवणाच्या एका प्लेटसाठी १०० डॉलर्स म्हणजेच ७५०० रुपये खर्च करावे लागत आहेत.
या विमानतळावर जे काही पाणी किंवा अन्न विकत घ्यायचे, त्यासाठी अफगाणिस्तानचे चलन घेतले जात नाही. तर फक्त डॉलर्समध्ये पेमेंट स्वीकारले जात आहे. त्यामुळे अफगाणी नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. जेवण आणि पाण्याच्या वाढत्या किंमतीमुळे लोकांना भुकेल्या पोटावर उन्हात उभे राहण्यास भाग पडत आहे.
त्यामुळे या लोकांचे शरीर कमकुवत होत असून आणि ते बेशुद्ध पडत आहेत. लोकांना मदत करण्याऐवजी तालिबान त्यांना घाबरवत आहे. मारहाण करत आहे. काबुल विमानतळाबाहेर झालेल्या गोंधळात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे.
अफगाणिस्तानातील लोकांचे म्हणणे आहे की, काबूलमधील घरातून विमानतळावर पोहोचण्यास ५ ते ६ दिवस लागले. विमानतळाच्या आत गेलात तरी विमान मिळण्यास पाच ते सहा दिवस लागतात. फक्त बिस्किटं आणि मिठाई यावर दिवस काढावे लागत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम