काय सांगता! अन्नदान करणे पडले महागात..?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- साईबाबांच्या शिर्डी नगरीत अन्नदात्यांनी अन्नदान करताना गर्दी जमवून कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याने संबंधितावर कारवाई करण्यात आल्याने अन्नदान करणे चांगलेच महाग पडले आहे.

अन्नदान करणारे नायर यांच्याविरोधात शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिर्डीत वर्षाकाठी मोठ्या संख्येने भाविक साईदरबारी हजेरी लावतात. अनेक साईभक्त भिक्षेकरूंना विविध प्रकारचे दान देततात.

मात्र याचा काहीजण गैरफायदा घेत आहेत. या कल्पनेतून देशविदेशातील साईभक्तांशी संपर्क साधून अन्नदानाच्या नावाखाली काही मंडळींनी गोरखधंदा मांडला असल्याची चर्चा आहे. तर भक्तांच्या भोळ्यापणाचा फायदा घेऊन येथील भिक्षेकरी लखोपती झाले आहेत.

पर्यायाने अपवाद वगळता गुन्हेगारी देखील वाढली. आजही करोनाच्या पार्श्वभूमीवर साईमंदीर बंद असले तरी अन्नदान करणाऱ्या लोकांमुळे मोठ्या प्रमाणावर भिक्षेकरुंची संख्या वाढली आहे.

या लोकांना कोणी वाली नसल्याने त्यांच्या कोरोनाच्या चाचण्या तसेच लसिकरण याबाबत कोणताही ताळमेळ नाही. शहरात करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नगरपंचायत प्रशासन कटीबद्ध असतांना अन्नदानामुळे गर्दी केली जात आहे.

शिर्डी पोलिसांनी याप्रकरणी लक्ष वेधले असून मधूस्वामी पद्मनाभन नायर यांनी अन्नदान करीत असताना गर्दी जमवल्यामुळे कोरोना संसर्गबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच यापुढे शिर्डी शहरात कोणीही अन्नदान करून गर्दी जमविण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्याचे जाहीर केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe