अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण (वय ४९) यांचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी दोन संशियताना पोलिसांनी अटक केली आहे.
त्यांच्या विरुद्ध सबळ पुरावे असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सागर गंगावणे व बिट्टू वायकर (दोघे रा. बेलापूर) या दोघांना अटक केली आहे.
त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावे मिळाले आहेत, त्यांनी कोणत्या कारणावरून अपहरण आणि खून केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अटक केलेल्या दोघांवर अनेक गुन्हे दाखल असून,
या गुह्यात आणखी आरोपी निष्पन्न होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हिरण १ मार्च रोजी यांचे बेलापूर येथून अपहरण झाले होते. ७ मार्च रोजी त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत वाकडी शिवारात रुळाच्या कडेला आढळून आला होता.
उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह घाटी (औरंगाबाद) येथील रुग्णालयात पाठविण्यात आला होता. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह श्रीरामपूर येथील निवासस्थानी आणण्यात आला होता.
दरम्यान, हिरण यांच्या डोक्यात जोरात मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटले आहेत.
भाजप अल्पसंख्याक मोर्चातर्फे बुधवारी राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष एजाज देशमुख व भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जैन समाज प्रमुख संदीप भंडारी यांनी दिली.
हिरण यांच्या हत्येमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण असून यातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी व्यापारी वर्गांकडून करण्यात येत आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|