Ahmednagar News : युवा सेनेचे सहसचिव विक्रम अनिल राठोड यांना कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना रामनवमीच्या मिरवणुकीत घडली.
राठोड यांनी याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर बुधवारी त्यांनी कोतवाली पोलिसात फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी गजेंद्र प्रकाश सैंदर (रा. अहमदनगर) याच्यासह अनोळखी चार ते पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
10 एप्रिल रोजी राठोड हे नेताजी सुभाष चौकात रामनवमी मिरवणुकीच्या स्वागतासाठी उभे होते. त्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी मिरवणुकीचे स्वागत करून
मिरवणुकीत नाचत असताना गजेंद्र सैंदर याने राठोड यांना धक्का दिला व त्याच्यासोबत आलेल्या त्याच्या साथीदारांनी राठोड यांना मारण्याच्या उद्देशाने त्यांना घेराव घातला.
राठोड यांच्या सहकार्यांनी त्यांना तेथून बाहेर काढले. त्यानंतर 10 मिनिटांनी मिरवणुकीतून जात असताना गजेंद्र सैंदर याने कोयत्याचा धाक दाखवून राठोड यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने ‘तू इकडे ये, मिरवणुकीत तुझा काटाच काढतो’, असा दम दिला.
सैंदर व त्याचे साथीदार काही दिवसांपासून जिवे मारण्याच्या उद्देशाने राठोड यांचा पाठलाग करत असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.