सत्तेत आल्यावर तुम्ही सर्व विसरलात मात्र जनता तुम्हाला योग्य वेळी आठवण करुन देईल…!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- आज चौहोबाजुंनी शेतकरी समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. या संकटातुन त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे तर दुरच मात्र महावितरणकडून याच शेतकऱ्यांकडून पठाणी वसूली करत रोहित्र बंद करणे,

त्यांचे वीज कनेक्शन कट करण्याचे गंभीर प्रकार महाविकास आघाडीच्या काळात वीज वितरण कंपनीकडून केले जात आहेत.

तरी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शेतीपंपाचे वीज कनेक्शन न तोडण्याचे आदेश महावितरणला द्यावेत. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा पिंप्री अवघडचे माजी सरपंच सुरेश लांबे यांनी दिला आहे.

लांबे यांनी म्हटले आहे की, सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेती व्यवसाय अतिशय अडचणीत सापडला आहे. वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. शेतकरी संकटात असताना पंचनामे करुन त्यांना नुकसानभरपाई द्यावी.

अनेकांना कर्जमाफीची रक्कम अजुनही मिळालेली नाही. इंधन तसेच शेतीसाठी लागणारे रासायनीक खतांचे भाव, पशूखाद्याचे वाढते भाव याकडे लक्ष देण्याचे सोडुन जनतेला वेठीस धरले जात आहे.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीजबिल वसुलीला स्थगिती देऊन शेवटच्या दिवशी स्थगिती उठवून एक प्रकारे शेतकरी, गोरगरीब जनतेची घोर चेष्टाच केली आहे. निवडणुकीत अनेक घोषणा केल्या.

सत्तेत आल्यावर तुम्ही सर्व विसरले पण जनता तुम्हाला योग्य वेळी आठवण करुन देईल, दुधाला, कांद्याला भाव नाही. अशा असलेल्या प्रतिकूल परिस्थितीत जनतेला जीवन कसे जगावे असा प्रश्न आहे.

पिकाला पाणी असताना महावितरण वीज रोहित्र बंद करत शेतकऱ्यांना झटके देत आहे. तरी  ना.तनपुरे यांनी शेतीपंपाची वीज न तोडण्याचे आदेश द्यावेत. वीज रोहित्र बंद करण्याचे काम न थांबल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेण्यात येईल, असेही लांबे यांनी म्हटले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe