सर्वसामान्यांना कोरोनाशी वाचवताना स्वत: कोरोनाबाधित झालेला शिवसैनिक कोरोनातून बरे होऊन पुन्हा जनसेवेसाठी सज्ज

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून सर्वसामान्यांना तो शिवसैनिक कोणतीही प्रसिध्दी न करता मदत पोहचवित होता. गाडीच्या डिक्कीत नेहमीच सर्वसामान्यांना मदत देण्यासाठी असलेल्या किराणा किट दुर्बल घटकांना देण्याचे कार्य सुरु होते.

तर कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत सर्वसामान्यांना गरज भासली उपचाराची, एप्रिल महिन्यात सर्वच सरकारी व खासगी रुग्णालय फुल असताना सर्वसामान्यांना दवाखान्यात बेड मिळवून देण्यासाठी अर्ध्या रात्री धावणार्‍या, त्या शिवसैनिकाला शेवटी कोरोनाने गाठलेच.

कोरोनातून बरे होऊन येताच पुन्हा जनसेवा सुरु करुन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे कॅमेर्‍यापासून अलिप्त राहून आपली सेवा अविरत चालू ठेवली आहे. दिवंगत माजी आमदार स्व. अनिल भैय्या राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली लहामगे यांनी शिवसेनेत आपले असतित्व निर्माण केले.

लहामगे यांनी राठोड यांच्याकडून जनसेवेची प्रेरणा घेऊन कार्य सुरु आहे. फोनवर मदतीला धाऊन जाण्याची शिकवण त्यांना स्व. राठोड यांच्याकडून मिळाली. कोरोना काळात न डगमगता, न घाबरता आणि जीवाची पर्वा न करता ते जनसामान्यांसाठी धावले.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत आर्थिक दुर्बल घटकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत दिली. दुसरी लाट सर्वांच्या जीवावरच बेतत असताना उपचारासाठी नागरिकांना बेड मिळत नव्हते. सरकारी व खासगी हॉस्पिटल फुल झाल्याने डॉक्टरांवर कोरोना रुग्णांवर उपचाराचा मोठा ताण होता.

अशा परिस्थितीत डॉक्टर देखील कोणाचेही फोन घेऊ शकत नव्हते. कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यापासून ते बेड मिळून ते चांगले होऊन घरी परते पर्यंत लहामगे यांनी रुग्णांना धीर व आधार देण्याचे कार्य केले. वेळेत उपचार मिळाल्याने अनेकांचे प्राण वाचले.

कोरोना रुग्णांना दवाखान्यात दाखल करत असताना त्यांना देखील कोरोनाची बाधा झाली. कोरोनावर उपचार करुन ते काही दिवसांनी बरे होऊन परतले. पुन्हा रुग्णांना प्लाझ्मा, औषधे मिळवून देण्यासाठी त्यांची धडपड सुरु होती.

या संकटकाळात बँक कर्मचार्‍यांचे लसीकरण झाले नसल्याची बाब त्यांच्या समोर आली. त्यांनी तातडीने जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी यांना बरोबर घेऊन महापालिका व जिल्हा प्रशासनाशी पाठपुरावा केला. या मागणीला यश येऊन बँक कर्मचार्‍यांना प्राधान्याने लसीकरण करण्याचे आदेश काढण्यात आले.

शासकीय अधिकारी यांच्या संपर्कात राहून अनेक गरजूंची कामे मार्गी लावण्यासाठी त्यांचे कार्य सुरु आहे. कोणत्याही प्रकारचे राजकारण व प्रसिध्दीचा गाजावाजा न करता सर्वसामान्यांना मदतीचा हात देणार्‍या या शिवसैनिकांचे कोरोना लढ्यात संघर्ष सुरु आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe