‘त्या’ राज्यांमध्ये कुणाची सत्ता ? वाचा एक्झिट पोलचे अंदाज

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :- देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आज संपली आहे. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांत मतदान झालं.

त्यांचे निकाल 2 मे रोजी जाहीर होतील. पण त्याआधी एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत भाजपनं आपली संपूर्ण ताकत पणाला लावली आहे.

मात्र एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात टीएमसीची सत्ता येणार असल्याचं चित्र आहे.

बंगालमध्ये भाजपा मारणार मुसंडी :- बंगालमध्ये २९२ जागांवर मतदान झाले. त्यापैकी १५०ते १७२जागांवर तृणमूलला विजय मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

राज्यात भाजपाच्या जागा वाढणार असून १३२ जागांपर्यंत भाजपा मुसंडी मारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेस-डाव्यांना मात्र सर्वच एक्झिट पोलने १०-१५ जागाच मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

आसामात भाजपाचे पुनरागमन :- आसाममध्ये एकूण १२६ जागा असून राज्यात भाजपाच पुनरागमन करणार असल्याचे म्हटले जात आहे. अधिकांश एक्झिट पोलने भाजपाला ७४ ते ८५ जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला.

तर काँग्रेस युतीला ४०-४५ जागाच मिळणार असल्याचे म्हटले आहे. तर अन्य पक्षांना प्रत्येकी एक जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

पुद्दुचेरीत एनडीए! :- पुद्दुचेरीतही भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएला १६ ते २० जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे तर काँग्रेस-द्रमुक युतीला ११ ते १३ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

केरळात काँग्रेसची पिछेहाट :- केरळात पुन्हा एकदा एलडीएफचे पुनरागमन होताना दिसत असून एलडीएफला १०० पेक्षा अधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सत्ताधारी एलडीएफला ७० ते ९० जागा मिळणार असल्याचे तर यूडीएफ युतीला २० ते ६४ जागांवरच समाधान मानावे लागू शकते. त्यामुळे काँग्रेसची पिछेहाट होणार असल्याचे चित्रणच एक्झिट पोलने केले आहे.

तामिळनाडूत स्टॅलिनच! :-तामिळनाडूत सत्ताधारी अद्रमुक यंदा सत्तेबाहेर जाणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. सर्वच एक्झिट पोलने अद्रमुकला ५५ ते ६८ जागा मिळेल असा अंदाज व्यक्त केला.

तथापि द्रमुक काँग्रेसयुतीला १६० ते १७२ जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसे जर घडले तर द्रमुक नेते स्टॅलिनची रणनीती यशस्वी ठरल्याचेच मान्य करावे लागेल.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe