अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- महानगरपालिकेत पुन्हा एकदा सत्तांतर झाले आहे. अडीच वर्षे झाले की तसे सत्तांतर होण्याची आता नगर शहराला सवय झालेली आहे. मात्र, कितीही सत्तांतरे झाली तरी अपवाद वगळता विकासासाठी काम करणाऱ्यांना संधी मिळते का?
आताही महापौर म्हणून शिवसेना पक्षाच्या रोहिणी संजय शेंडगे यांची वर्णी लागली आहे. त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. मात्र, त्यांनी आतापर्यंत नेमके काय, कुठे आणि कसे ठोस विकासाचे काम केलेले आहे याचे उत्तर नेमके कोण देणार, असा प्रश्न इंद्रायणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. योगेश चिपाडे यांनी केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, पक्षनिष्ठा म्हणून शिवसेनेने संजय शेंडगे यांच्या कुटुंबात हे पद दिलेही असेल. आतापर्यंत दुर्दैवाने अहमदनगर महानगरपालिकेत अपवाद वगळता अशाच पद्धतीने पदावर वर्णी लागलेली आहे.
त्यामुळे शहराचा विकास ठप्प झालेला आहे. शेंडगे ताई या आमच्या भागातील नगरसेविका आहेत. वर्षानुवर्षे त्यांच्या कुटुंबियांचे आणि या भागातील प्रत्येक नगरसेवकाचे काम मी पाहत आहे. काहींना पदावर जाऊन शहराच्या विकासाच्या कामाची संधीही मिळाली.
पण पुढे त्यांनी या भागाचा किंवा शहराचा काय विकास केला यावर पीएचडी करता येईल का? शिवसेना पक्षाने याचेही उत्तर द्यावे. कोणत्याही पक्षाने योग्य व्यक्तीला उमेदवारी द्यायला पाहिजे आणि विकासाची किमान जाण आणि विचार असलेल्या व्यक्तींना निवडून देण्याची जबाबदारी नगरमधील सुज्ञ मतदारांची आहे.
मात्र, तत्कालीन निवडणुकीत दिलेल्या खोट्या आश्वासनास मतदार बळी पडतात आणि मग विकास न करूनही वर्षानुवर्षे अनेकजण खुर्च्या उबवतात. आताही तसेच घडले आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचे काम करणारे कोणीही विचारी व विकासाभिमुख व्यक्ती जर महापौर पदावर असतील तर काय बदल होतो
हे पुणे शहरात आपण पाहतो. त्या पद्धतीने नाही पण त्याच्या जवळ जाणारे नेतृत्वही आपल्या शहराला न लाभणे हे आपले सर्वांचे दुर्दैव आहे. महापौर म्हणून शेंडगे ताई यांनीही आता पुढील काळात जर दमदार विकासाचे काम केले तर मीही त्यांचे जाहीर कौतुक नक्कीच करणार आहे.
पण आता त्यांनी पदभार घेताना आतापर्यंत नेमके काय ठोस कार्य केले हेही सांगितले तर बरे राहील, असे आव्हान डॉ. चिपाडे यांनी दिले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम