अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- उच्चस्तरीय कालवे पाणी हक्क संघर्ष समिती अकोले, सर्व पक्षीय शेतकरी व कार्यकर्ते यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी शुक्रवार दि. 3 सप्टेंबर 2021 रोजी, सकाळी 11 वाजता पाणी हक्क मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मोर्चा महात्मा फुले चौकातून थेट अकोला तहसील कार्यालयावर येणार असून यावेळी प्रशासनाने याची दखल घ्यावी, आमचा हा मोर्चा कोणत्याही राजकीय पक्ष तथा सरकारच्या विरोधात नसून आमच्या हक्कासाठी हा लढा आहे.
या लढ्यामध्ये सर्व राजकीय नेत्यांनी आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून आपल्या हक्कासाठी आता सामील व्हावे असे आवाहन डॉ. अजित नवले यांनी केले.
अकोले शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. अजित नवले म्हणाले, जो पर्यंत जलसेतूचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत लाभ क्षेत्रातील कोणतेही काम पूर्ण करून देणार नाही,
यासाठी या कामातील प्रशासकीय अधिकारी व ठेकेदाराचा खोडसाळपणा व गलथानपणामुळे उच्चस्तरीय कालवा पाणी हक्क संघर्ष समितीचा लढा हा शेवटपर्यंत आम्ही चालू ठेवू. निळवंडे धरणाचे काम पूर्ण होऊन अनेक वर्षांचा काळ लोटला, तरी अजून अकोले तालुक्यातील शेतकर्यांना हक्काचे पाणी अद्याप मिळालेले नाही.
अनेक गावे अजूनही पाण्यापासून वंचित आहेत. तालुका अजूनही दुष्काळाच्या झळा सोसत आहे. उजव्या उच्चस्तरीय कालव्याचे काम दोन तीन वर्षांपूर्वीच पूर्ण झाले आहे. केवळ नदी पात्रातील जलसेतूचे काम जाणीवपूर्वक अनेक वर्षे रेंगाळत ठेवल्यामुळे या उजव्या उच्चस्तरीय कालव्यामध्ये पाणी सोडता आलेले नाही.
या आहेत प्रमुख मागण्या
– उजव्या उच्चस्तरीय कालव्यात पाणी सोडण्यासाठी प्रवरा नदीवरील जलसेतूचे काम तातडीने पूर्ण करावे.
– उजव्या व डाव्या उच्चस्तरीय कालव्यांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावी
– डोंगरांच्या पायथ्यापर्यंतचे क्षेत्र सिंचित व्हावे यादृष्टीने कालवे व उप कालव्यांचा विस्तार करून ही कामे तातडीने पूर्ण करावी.
– भंडारदरा व निळवंडे जलसाठ्याचे संयुक्त जलव्यवस्थापन करून अकोले तालुक्यातील शेतीला बारमाही पाणी द्या.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम