अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:- जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व तालुकास्तरीय यंत्रणांना दिल्या असून बाधित रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांच्या चाचण्या करण्यावर अधिक भर देण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिली.
कोरोनापासून बचावासाठी सार्वजनिक अथवा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, चेहर्यावर मास्क वापरा, वारंवार हात धुवा, सॅनिटायझर वापरा आणि सोशल डिस्टन्सिंचे पालन करा, असे आवाहन त्यांनी जिल्हावासियांना केले आहे. लॉकडाऊनची वेळ येऊ नये, यासाठी नियमांचे पालन ही सर्वांची जबाबदारी आहे.
जिल्हावासीय हे नियम निश्चित पाळतील आणि लॉकडाऊनची वेळ जिल्ह्यात येऊ देणार नाहीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी गेले दोन दिवस कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढती असलेल्या संगमनेर, राहाता, कोपरगाव, पारनेर, श्रीगोंदा तालुक्यांचा दौरा करुन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.
जिल्हा परिषदेचे मुखय कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्यासह त्यांनी तेथील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आदींची आढावा बैठक घेऊन सूचना केल्या. आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाविषयक उपाययोजनांचा पुन्हा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, तालुकास्तरावर आता कोविड केअर सेंटर पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास सांगितले आहे.
डीसीएचसीही सुरु करण्यात आल्या आहेत. त्याठिकाणी आवश्यक असणारी औषधे जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. एकीकडे कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना लसीकरण मोहिमही तेवढ्याच जोमाने सुरु आहे. लसीचा पुरेसा साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे. अर्थात, लसीकरण झाले असले अथवा नसले तरी सार्वजनिक ठिकाणी कोरोना प्रतिबंधासाठी ज्या उपाययोजना आवश्यक आहेत, त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्वांवर आहे.
केवळ दंड करणे हा उपाय नसून नागरिकांनी स्वताहूनच याकामी पुढाकार घ्यायला हवा. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंन्सिंग ही त्रिसूत्री महत्वाची आहे. अगदी गावपातळीवरील यंत्रणांनी त्याबाबत दक्षता घेऊन नागरिकांना त्यासाठी प्रेरित केले पाहिजे. तालुकास्तरीय यंत्रणांनी आता अधिक गतीने प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|