अल्पवयीन मुलीचे लग्न भोवणार…? आईवडिल-नातेवाईकांसह भटजी,मंडपवाल्यावर देखील गुन्हा…!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- पाथर्डी तालुक्यातील शिरसाठवाडी येथे एका अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात तब्बल २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये नवरदेव मुलगा, मुलाचे आई-वडील, मुलीचे वडील, लग्न लावणारे भटजी तसेच या लग्नासाठी मंडप-डेकोरेशन करणारे व्यावसायिक आणि लग्नास उपस्थित असणारे दोन्हीकडील २०-२५ नातेवाईकांचा समावेश आहे.

शिरसाठवाडी ग्रामसेवकाच्या तक्रारी नंतर काल या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाथर्डी तालुक्यातील शिरसाठवाडी येथे २५ ऑगस्ट रोजी एका अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्यात आले.

याबाबतची माहिती मुंबई येथील मर्जी या सामाजिक संस्थेला समजल्यानंतर संस्थेचे संस्थापक मंगेश सोनवणे यांनी ही माहिती अहमदनगर येथील चाईल्डलाईन, बालकल्याण समिती आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिली.

त्यानंतर चाईल्डलाईनचे सदस्य प्रवीण कदम यांनी पाथर्डी पोलीस आणि शिरसाठवाडीच्या ग्रामसेविका अर्चना विठ्ठल सानप यांच्याशी संपर्क करून सदर प्रकरणाची माहिती दिली.

त्यानंतर ग्रामसेविका अर्चना सानप यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पाथर्डी पोलिसांनी सदरचा गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe