उन्हाळी आवर्तन सुटल्याने हजारो हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- सोमवारी (ता.15) सकाळी सहा वाजता मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून उन्हाळी हंगामातील सिंचनासाठीचे पहिले आवर्तन सोडण्यात आले.

चाळीस दिवस चालणार्‍या या आवर्तनासाठी 4500 दशलक्ष घनफूट पाणी वापर होईल. दरम्यान मुळा धरणात आज अखेर 20 हजार 450 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे.

अचल साठा वगळता 15 हजार 950 दशलक्ष घनफूट पाणी धरणात उपलब्ध आहे. उजव्या कालव्याद्वारे राहुरी, पाथर्डी, नेवासा व शेवगाव तालुक्यांतील तीस हजार हेक्टर क्षेत्रासाठी हे आवर्तन सोडण्यात आले.

वांबोरी उपसा पाणी योजनेसाठी 15 फेब्रुवारीपासून आवर्तन सुरू आहे. ते शंभर दिवस चालेल. त्यासाठी 680 दशलक्ष घनफूट पाणी मंजूर आहे. राहुरी, नगर, नेवासा व पाथर्डी तालुक्यांतील 101 गाव तलाव त्यातून भरून घेण्यात येणार आहेत.

डाव्या कालव्यांतून शुक्रवारपासून (ता.5) सोडलेले आवर्तन 26 मार्चपर्यंत चालेल. त्यातून राहुरी तालुक्यातील साडेतीन हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

या आवर्तनासाठी पाचशे दशलक्ष घनफूट पाणी वापर होईल. उन्हाळी हंगामातील सिंचनाचे उजव्या कालव्याद्वारे दोन; तर डाव्या कालव्याद्वारे तीन आवर्तने सोडण्यात येणार आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News