दुसऱ्या लाटेतच मनपा निषक्रियतेमुळे शहरात भयावह स्थिती, तर तिसऱ्या लाटेत काय निभाव लागणार ?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- काँग्रेसने वारंवार मागणी, पाठपुरावा करूनही मनपाने अजूनही ऑक्सीजन जम्बो कोविड सेंटर उभारण्यासाठी काहीच हालचाल न केल्यामुळे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली ऑक्सिजन मास्क लावून काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे मनपा आयुक्त शंकर गोरे यांच्या दालनामध्ये जोरदार ठिय्या आंदोलन सकाळ पासून सुरु आहे.

काँग्रेस पदाधिकारी संतप्त, आक्रमक झाल्यामुळे मनपात तणावपूर्ण निर्माण झाले आहे. आंदोलनात काळेंसह ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेचा, उपाध्यक्ष खलील सय्यद, काँग्रेस नेते फारुख शेख, उपाध्यक्ष अनंतराव गारदे,

विद्यार्थी कॉंग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड.अक्षय कुलट, क्रीडा काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते आदी सहभागी झाले आहेत. हातामध्ये मागणी आणि मनपा निषेधाचे फलक धरत पदाधिकाऱ्यांची बेड साठी जोरदार घोणाबाजी सुरू आहे.

कोरोना संकटकाळात महाराष्ट्रात “बाबांनो, आता तरी ऑक्सिजन द्या रे” या मागणीसाठीच्या अशा प्रकारच्या आंदोलनाला सामोरे जायची नामुष्की आलेली नगर मनपा ही राज्यातील पहिली मनपा ठरली आहे.

राज्यात भाजपला दूर ठेवत महाविकास आघाडीची सत्ता असली तरी मनपात मात्र राष्ट्रवादीचे आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजप – राष्ट्रवादी युतीची सत्ता आहे.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दोन आठवड्यांपूर्वी घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीमध्ये मनपा आयुक्तांना ऑक्सीजन बेडचे जम्बो कोविड सेंटर उभारण्याबाबत निर्देश देऊन देखील अजूनही कोणतीच पाऊले उचललेली नाहीत. मनपा अजून किती नगरकरांचे जीव गेल्यावर जागी होणार आहे ? असा सवाल काँग्रेसने केला आहे.

मनपाचे ४८ तासातच घूमजाव :-काँग्रेसने वारंवार मनपाकडे पाठपुरावा केला आहे. यासाठी दोन वेळा आयुक्त यांच्या समवेत तसेच एकदा आयुक्त, महापौर, उपायुक्त, आरोग्य अधिकारी यांच्यासमवेत काँग्रेसची संयुक्त बैठक पार पडली होती.

यात विषय मार्गी लावण्यासाठी तातडीने बजेट तयार करत कृती केली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र मनपाने ४८ तासातच घूमजाव केले असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे.

मनपा सपशेल फेल, तर “आयुक्त खोटारडे” :- मनपा आयुक्तां समवेत झालेल्या बैठकांमध्ये ऑक्सिजन बेड सेंटर उभारणी कामी मनपाला काँग्रेसने प्रत्यक्ष कृतीतून मदत करण्याचा प्रस्ताव दिला होता. मनपाने सहकार्याचे आश्वासन दिले होते.

काँग्रेसने राजकारण टाळण्याच्या दृष्टीने अराजकीय व्यासपीठाच्या (नगर विकास मंच) माध्यमातून जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे क्रीडा हॉस्टेलची जागा ऑक्सिजन सेंटरचे एक युनिट उभे करण्यासाठी मिळावी यासाठी अर्ज केला होता.

जागा देण्याबाबत क्रीडा विभाग सकारात्मक होता. मात्र यावर अधिकारीस्तरावर काल सायंकाळी (दि.५ मे) चर्चा झाली असता मनपा आयुक्तांनी असा कोणताही प्रकल्प विचाराधिन नसल्याचे सांगितल्याची बातमी बाहेर आल्यानंतर काँग्रेस पदाधिकारी यांनी आयुक्तांना खोटारडे म्हणत तीव्र संताप व्यक्त केला.संकट काळामध्ये नागरिकांना आरोग्य सेवा देण्यात मनपा सपशेल फेल झाली असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

पडद्या आडून आडथळा आणणारे शहराचे आमदाराच झारीतील खरे शुक्राचार्य :- काँग्रेसचे म्हणणे आहे की, कोणीही राजकारण करू नये. ही वेळ नाही. आम्ही शहरातील नागरिकांना ऑक्सीजन, व्हेंटिलेटर बेड मिळावे,

त्यांची ससेहोलपट थांबावी, नागरिकांचे ऑक्सिजन अभावी होणारे मृत्यू थांबावेत यासाठी मागणी केली आहे. यात शहराच्या कार्या(शून्य)सम्राट आमदारांनी मनपाच्या माध्यमातून विनाकारण घाणेरडे राजकारण सुरू केले असून संकट काळात निव्वळ राजकीय द्वेषातून पडद्यामागून आडथळा आणणारे “तेच” खरे झारीतील शुक्राचार्य आहेत.

ते केवळ नाटकी असून आपण कोरोना काळात खूप मोठे कार्य करीत असल्याचा दिखावा करत आव आणत आहेत, असा आरोप किरण काळे यांनी केला आहे.

ऑक्सीजन बेड उपलब्ध करून देण्यात आयुक्त स्वतःच अपयशी :- किरण काळे यांनी सांगितलेल्या हकिगती प्रमाणे, कोरोनातून बरे होऊन घरी गेलेल्या परंतु पुन्हा ऑक्सिजन पातळी ८५ इतकी खाली गेलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकांनी काँग्रेस हेल्पलाईनवर काल (५ मे) मध्यरात्री संपर्क साधला.

काळेंनी मध्यरात्रीच आयुक्तांना फोन लावत तातडीने ऑक्सिजन बेड मिळवून देण्याची मागणी केली. आयुक्तांनी आरोग्य आधिकऱ्यांशी संपर्क करा असे सांगत अंग झटकले. आरोग्य आधिकऱ्यांनी पूर्वी उपचार घेतलेल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा असा सल्ला दिला.

मात्र त्यापूर्वीच रुग्णाच्या नातेवाईकांनी तो प्रयत्न करून झाला होता. बेड मिळाला नव्हता. त्यानंतर काळे यांनी शहरातील दोन मोठ्या हॉस्पिटलला बेडसाठी विचारणा केली. तिथेही बेड उपलब्ध नव्हते. सुमारे ७० रुग्ण आधीच बेडसाठी प्रतीक्षेत असल्याचे यापैकी एका रुग्णालया कडून काळे यांना सांगण्यात आले.

दरम्यान आयुक्तांनी काळे यांना फोन करत आरोग्य आधिकऱ्यांनी दिलेला सल्ला परत दिला. काळे यांनी त्यानंतर अजून काही हॉस्पिटलमध्ये बेडसाठी शोधाशोध केली. तरी बेड अखेर मिळालाच नाही. अशी गंभीर स्थिती सध्या शहराची झाली आहे.जिथे मनपा आयुक्त स्वतःच बेड मिळवून देऊ शकत नाहीत, तिथे सामान्य नगरकरांनी काय करायचे असा प्रश्न काळेंनी केला आहे.

दुसऱ्या लाटेतच मनपाच्या निषक्रियतेमुळे शहरात अशी भयावह स्थिती आहे तर तिसऱ्या लाटेत काय निभाव लागणार असा संतप्त सवाल किरण काळेंनी उपस्थित केला आहे. यावर आता मनपाने स्वतःच जम्बो सेंटर तातडीने उभे करणे अत्यंत गरजेचे असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

आयुक्त, उपायुक्त आमदारांचे घरगडी आहेत का ? :- काँग्रेसने ऑक्सिजन बेडच्या केलेल्या मागणी वरून राजकारण पेटले आहे. काँग्रेसने क्रीडा हॉस्टेल मध्ये एक युनिट उभे करण्यासाठी मनपाला प्रस्ताव दिला होता.

पण उपायुक्त डांगे यांनी दूरध्वनी वर बोलताना आम्ही आयुर्वेद महाविद्यालात ते सुरू करणार आहोत असे सांगितले. यावर किरण काळे म्हणाले की, आयुर्वेदाला ऑक्सिजन बेड लावा नाही तर आमदारांच्या घरी लावा. कुठे ही लावा.पण बेड लावा. काँग्रेसला श्रेय नको असून नागरिकांचा प्रश्न सुटला पाहिजे. आयुक्त, उपायुक्त आमदारांचे घरगडी आहेत का ? त्यांनी तसे न वागता लोकांचे सेवक म्हणून काम करावे असे किरण काळे म्हणाले.

आयुक्त येत नाहीत तो पर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार :-  आयुक्तांनी उपयुक्त डांगे यांना आंदोलकांच्या भेटी साठी पाठविले होते. मात्र आंदोलकांनी त्यांच्याशी चर्चा करण्यास नकार दिला. यामुळे उपयुक्तांना परत जावे लागले.

किरण काळे म्हणाले की, आयुक्तांना दाखवायला तोंड राहिलेले नसल्यामुळेच ते स्वतः च्या कार्यालयात येण्यापासून पळ काढत आहेत. आयुक्त जोपर्यंत स्वतः येवून ऑक्सिजन बेड उभारणी बाबत ठोस आश्वासन देत नाहीत तो पर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहील असा आक्रमक पवित्रा काँग्रेसने घेतला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe