नगर अर्बनच्या अपहार प्रकरणी ‘या’ डॉक्टरला अटक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:-  नगर अर्बन बँकेच्या पिंपरी चिंचवड शाखेतील 22 कोटींच्या अपहार प्रकरणी डॉ.नीलेश शेळके यास पिंपरी चिंचवड पोलिसांनी सोमवारी अटक केली.

डॉ. शेळके हा नगर शहर बँकेच्या गुन्ह्यात अटकेत होता.त्याला मंगळवारी मोरवाडी न्यायालयात हजर करण्यात येईल, असे चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी सांगितले. शहर बँकेच्या गुन्ह्यात शेळके अटक असल्याने ताब्यात घेण्यासाठी दोन दिवसांपासून आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक नगरमध्ये तळ ठोकून होते.

मात्र, डॉ. शेळके याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी गुन्ह्यात वर्ग करण्याची सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून डॉ. शेळके याला आज अटक केली. त्यामुळे अटक आरोपींच्या आता पाच झाली आहे.

नगर अर्बन बँकेचे अधिकारी महादेव साळवे यांच्या फिर्यादीवरून 25 जानेवारी 2021 रोजी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. नगर अर्बन बँकेच्या पिंपरी-चिंचवड शाखेत प्रत्येकी 11 कोटी रुपयांची दोन बोगस कर्ज प्रकरणे करण्यात आलेली आहेत.

त्यात मिळकतीचे बनावट मूल्यांकन सादर करून बँकेची फसवणूक केल्या आरोपावरून कर्ज उपसमिती सदस्य, बँकेचे संचालक मंडळ सदस्यांसह आणखी सहा जणांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

याप्रकरणी पिंपरी चिंचवड येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तत्कालीन संचालक नवनीत सुरपुरिया, यज्ञेश चव्हाण, आशुतोष लांडगे, जयदीप वानखेडे यांना अटक केली असून सध्या ते कोठडीत आहेत. शहर बँकेच्या गुन्ह्यात अटकेत असलेले डॉ. नीलेश शेळके याचे नाव नगर अर्बन बँकेच्या गुन्ह्यात निष्पन्न झाले.

22 कोटींपैकी काही रक्कम डॉ. शेळके यांच्या खात्यावर गेली असल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे डॉ. शेळके यास या गुन्ह्यात अटक करण्यात आली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe