अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :-कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून, नागरिकांनीही प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे. असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
संकटाच्या काळातही जिल्ह्यातील विकास कामांच्या अंमलबजावणीचे प्रयत्न सुरु असून त्यासाठी राज्यस्तरावरुनही अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याची माहितीही त्यांनी दिली.
स्वातंत्र्यदिनाच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त येथील पोलीस परेड मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी पालकमंत्री म्हणाले की, स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव आपण साजरा करत आहोत.
सध्या कोरोनाचे आव्हान आपल्यासमोर असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य शासन, जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संघटना योगदान देत आहेत. कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांचा आपण सामना केला. आता तिस-या लाटेचे संकट समोर आहे.
अशावेळी सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळणे, घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे, लक्षणे जाणवल्यास तात्काळ उपचार घेणे अशा प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या माध्यमातून आणि प्रत्येकाने योग्य ती काळजी घेत स्वताचे आरोग्य जपावे, असे आवाहन त्यांनी केले.जिल्ह्यात आजपासून ई-पीक पाहणी अभियानास सुरुवात होत आहे.
शेतकर्यांना त्यांच्या शेतातील पिकांची नोंद आता अॅपद्वारे स्वता करता येणार आहे, यापूर्वी पारंपरिक पद्धतीने तलाठ्यांमार्फत पीकपेरा नोंद केली जात होती. आता शेतकरी स्वता ती नोंद करु शकतील. डीजीटल कृषी क्रांतीपर्वाकडे आपण वाटचाल करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम