‘तुमचा उद्धव..आमच्या मोदींसमोर नाक घासून आला…’

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- जाऊन सांगा आज सेनाभवन समोर भिडणाऱ्या शिवसैनिकांना..तुमचा उद्धव.. आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे. मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात ?? मानले मुंबईतील भाजप युवा मोर्चाला, अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी ट्विट करून केली आहे.

राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप युवा मोर्चाने काढलेल्या फटकार मोर्चात मोठा राडा झाला. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह महिला कार्यकर्त्यांनाही शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावरुनच नितेश राणे यांनी टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आदी नेते उपस्थित होते. त्यानंतर या नेत्यांनी पंतप्रधान मोदींसोबत मराठा आरक्षणावर सुमारे 1 तास 45 मिनिटे चर्चा केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला.

पंतप्रधानांना भेटण्यासाठी आम्ही तिघे आलो, सचिवहीसोबत आहेत. राज्याचे विषय कोणते, कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली हे सर्वांना माहीत आहे. सर्व विषय मोदींनी गांभीर्याने ऐकून घेतले. प्रत्येक विषयांची पत्रंही आम्ही दिली आहेत. राज्यांचे अनेक विषय मांडले.

त्याबाबत मोदींनी लक्ष घालतो असं सांगितलं. मोदी हे प्रश्न सकारात्मकपणे सोडवतील अशी अपेक्षा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनेच्या 7 तर भाजपच्या 30 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी दुपारी आंदोलनादरम्यान झालेल्या गोंधळाप्रकरणी शिवसेनेच्या चंदू झगड़े, राकेश देशमुख, अभय तमोरेंसह इतर 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 143, 147, 149, 392, 324, 323, 354, 509 यांसह विविध कलमांतर्गत दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे भाजपा युवा मोर्चाच्या तजिंदर सिंह तिवाना (आयोजक), अजित सिंह आणि इतर एकूण 30 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कलम 188, 269 IPC, 51 तसेच राष्ट्रीय आपात्कालीन कायद्याच्या उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास शिवाजी पार्क पोलिसांकडून केला जात आहे. अयोध्येतील श्री राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप केल्याचा दावा करत भाजपने फटकार मोर्चा आयोजित केला आहे.

भाजप युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मात्र शिवसेना भवनापासून 5 किमी अंतरावरच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अडवलं आणि ताब्यात घेतलं.

पोलिसांच्या व्हॅनमधून भाजप कार्यकर्त्यांना घेऊन जात असताना शिवसेना भवनासमोर उपस्थित असलेल्या शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe