अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी येथे सोमवारी (२४ मे) रात्री किरकोळ वादातून शरद दत्तात्रय वाघ (रा. पिंपळगाव उज्जैनी, ता. नगर) या तरुणाची धारदार शस्त्राने पोटात वार करून हत्या करण्यात आली.
याप्रकरणी नगर एमआयडीसी पोलीस स्टेशनला परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाल्या आहेत.याबाबत सविस्तर माहिती अशी की नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी येथील बाळासाहेब नामदेव वाघ (वय ५० रा. पिंपळगाव उज्जैनी) यांनी फिर्याद दिली आहे.
पिंपळगाव उज्जैनी शिवारातील ससेवाडी रोडवर तलावाच्या जवळ सोमवारी रात्री आठच्या सुमारास शरद दत्तात्रय वाघ हा मित्रासमवेत धिंगाणा घालत असल्याचा राग मनात धरून सुभाष बन्सी आल्हाट, ऋषीकेश रघुनाथ आल्हाट,
मारीया बन्सी आल्हाट यांच्या सांगण्यावरून मल्हारी उर्फ रघुनाथ बन्सी आल्हाट या आरोपीने धारदार शस्त्राने मयत शरद दत्तात्रय वाघ याच्या पोटात वार केल्याने तो गंभीर जखमी झाला.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मल्हारी उर्फ रघुनाथ बन्सी आल्हाट, सुभाष बन्सी आल्हाट, बन्सी भिवा आल्हाट, ऋषीकेश रघुनाथ आल्हाट, मारीया बन्सी आल्हाट यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील आरोपी सुभाष आल्हाट, बन्सी आल्हाट आणि मारीया आल्हाट यांना अटक केली आहे. यातील आरोपी मल्हारी आल्हाट याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी सहायक पोलिस निरिक्षक युवराज आठरे हे तपास करत आहेत.
याच प्रकरणातील दुसऱ्या गुन्ह्यात मल्हारी बन्सी आल्हाट यांच्या फिर्यादीवरून शरद दत्तु वाघ, रेवननाथ वाघ, शंकर वाघ, गुल्या काकडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत म्हटले, की आरोपी फिर्यादींच्या घराजवळील मोकळ्या जागेत दारु पिऊन धिंगाणा घालत असतांना त्यांचा मुलगा ऋषिकेश आल्हाट हा त्यांना धिंगाणा घालू नका असे सांगण्यासाठी गेला होता.
त्यावेळी आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करत डोक्याच्या पाठीमागे मारहाण करत जबर जखमी केल्याची फिर्याद दाखल केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम