अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- सभा ऑनलाईन कि ऑफलाईन या विषयावरून झेडपीमध्ये नेहमीच गोंधळ उडत होता. मात्र ता या गोंधळावर पडदा पडणार असून जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा आता ॲाफलाईन होणार आहे.
त्यामुळे गेल्या सव्वा वर्षापासून सुरू असलेल्या ॲानलाईन सभेला ब्रेक लागणार आहे. विविध विषयांवर चर्चा करता यावी, यासाठी येत्या १४ जून रोजी ॲानलाईन होणारी सर्वसाधारण सभा ॲाफलाईनच होणार आहे.
दरम्यान जिल्हा प्रशासनानेच सभेला परवानगी दिल्याने प्रत्यक्ष सदस्यांच्या उपस्थितीत सभागृहात सभा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा परिषद अधिनियमानुसार दर तीन महिन्यांनी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक आहे.
या नियमानुसार येत्या २४ जूनला मागील सर्वसाधारण सभेचा तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आहे. त्यामुळे त्याआधी १४ जूनला जिल्हा परिषद प्रशासनाने सभा आयोजित केली होती. सभेबाबत प्रशासनाने २८ मे रोजी सदस्यांना लेखी कळवले.
परंतु तेव्हा जिल्ह्यात लाॅकडाऊन असल्याने प्रशासनाने सभा ॲानलाईन आयोजित केली होती. त्याला विरोधी सदस्यांनी आक्षेप घेतला होता. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची वेळ येऊ नये म्हणून सत्ताधारी सतत ॲानलाईन सभा घेत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.
मात्र आता झेडपीच्या सदस्यांना प्रत्यक्ष सभेला उपस्थित राहून चर्चा करता येणार आहे. अनेक सदस्यांनी या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम