आई-बाबा होणार आहात? तर बाळाच्या जन्मापूर्वी आईने या तपासण्या करायला हव्या!

गर्भधारणेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आईने रक्त, मधुमेह, सोनोग्राफी, अ‍ॅनोमली स्कॅन व आनुवंशिक तपासण्या करणे गरजेचे आहे. योग्य वयात विवाह व बाळंतपणाचे नियोजन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.

Published on -

अहिल्यानगर- गर्भधारणेचे सर्वसामान्य आणि पहिले लक्षण म्हणजे मासिक पाळी बंद होणे. या टप्प्यावर शरीरात ‘ह्यूमन कोरियोनिक गोनाडोट्रोपिन’ (HCG) नावाचा हार्मोन निर्माण होतो. यालाच प्रेग्नंसी हार्मोन म्हटले जाते. यामुळे गर्भधारणा झाल्याचे निदान करता येते.

प्राथमिक आरोग्य तपासण्या

गर्भधारणा झाल्यानंतर सुरुवातीला रक्तगट, लोहाची पातळी (हीमोग्लोबिन), मधुमेह (ब्लड शुगर), थायरॉइड कार्य, आणि रुबेला व इतर संसर्गावरील प्रतिकारशक्ती याची तपासणी केली जाते. यामुळे आईच्या आरोग्याची पूर्वतयारी करता येते.

सोनोग्राफी

गर्भधारणेच्या पहिल्या तीन महिन्यांत केले जाणारे अल्ट्रासाऊंड हे वेदनारहित असते. यामध्ये गर्भाची स्थिती, बाळांची संख्या आणि संभाव्य प्रसूतीची तारीख यांचा अंदाज घेतला जातो.

अनोमली स्कॅन

१८ ते २० आठवड्यांदरम्यान केल्या जाणाऱ्या अल्ट्रासाऊंडला ‘अनोमली स्कॅन’ म्हणतात. या विशेष सोनोग्राफीमध्ये बाळाच्या हृदय, मेंदू, किडनी आणि इतर अवयवांच्या वाढीचे बारकाईने परीक्षण होते. यामुळे कोणतेही जन्मजात विकार (जसे की हृदय दोष, मज्जासंस्थेतील अडचणी) वेळेत लक्षात येतात.

वाढ व स्थिती तपासणी

गर्भधारणेच्या शेवटच्या तीन महिन्यांत बाळाची एकूण वाढ, बाळाभोवती असलेल्या अम्नियोटिक फ्लुइडचे प्रमाण, आणि प्लेसेंटाची स्थिती तपासण्यासाठी अंतिम अल्ट्रासाऊंड केला जातो. प्रसूतीपूर्व तयारीसाठी ही माहिती महत्त्वाची असते.

आनुवंशिक तपासण्या

नात्यात विवाह झालेल्या जोडप्यांमध्ये आनुवंशिक आजारांची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा परिस्थितीत ब्लड मार्कर टेस्ट आणि अधिक सखोल सोनोग्राफीच्या साहाय्याने अशा आजारांचे निदान केले जाते.

इतर चाचण्या

CBC (Complete Blood Count), थायरॉइड फंक्शन टेस्ट, आणि मधुमेहाची साखर तपासणी यासह नियमित रक्तदाब तपासणी केली जाते. यामुळे प्री-एक्लॅम्प्सिया, ॲनिमिया, हाय ब्लड शुगर यांसारख्या स्थितींवर नियंत्रण ठेवता येते.

विवाह आणि मातृत्वाचे योग्य वय

विवाह ही आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे. ती योग्य वयात झाली तर मातृत्वाचे स्वप्नही सुरक्षितपणे पूर्ण होऊ शकते. बाळ होण्यासाठी आईचे वय ३५ वर्षांखाली आणि वडिलांचे वय ४० वर्षांखाली असावे, असा सल्ला डॉ. एकता डेरे-वाबळे यांनी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News