बाली-थायलंडलाही मागे टाकणार सिंधुदुर्गातील निवती; पर्यटनातून स्थानिकांसाठी हक्काचा रोजगार

Published on -

Best Picnic Spot : परदेशातील बाली आणि थायलंडसारख्या प्रसिद्ध पर्यटनस्थळांनाही टक्कर देईल असे नैसर्गिक सौंदर्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती परिसरात पाहायला मिळत आहे. किनाऱ्यापासून सुमारे १५ ते १६ किलोमीटर अंतरावर असलेले निवती लाईट हाऊस आणि परिसरातील तब्बल आठ नैसर्गिक व ऐतिहासिक स्थळे सध्या पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहेत.

मागील आठवड्यात सलग तीन दिवसांच्या सुट्टीत पाच हजारांहून अधिक देशी-विदेशी पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिल्याची माहिती मेढा ग्रामपंचायतीने दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दोन-तीन वर्षांत पर्यटनाला विशेष गती मिळाली आहे. मालवण तालुक्यातील देवबाग, तारकर्ली, वायरी, दांडी यांसारख्या पारंपरिक पर्यटनस्थळांवर सुट्टीच्या हंगामात मोठी गर्दी आणि वाहतूक कोंडी होत असल्याने अनेक पर्यटकांनी आता आपली दिशा बदलली आहे.

याचा थेट फायदा वेंगुर्ले, देवगड आणि सीमावर्ती भागातील नव्या पर्यटनस्थळांना होत आहे. वायंगणी समुद्रकिनारा, मोचेमाड, आरवली, रेडी, खवणे चौपाटी यांसह भोगवे, आडवेळ, मेढा आणि निवती किल्ला हे ठिकाणे पर्यटकांच्या पसंतीस उतरू लागली आहेत.

निवती लाईट हाऊस परिसरातील नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालत आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली ‘म्हातारीची चूक’ म्हणजे चिंचोळ्या खडकातून उसळणाऱ्या फेसाळ लाटा,

म्हातारीची गुहा, जॉइंट रॉक, गोल्डन रॉक, जुने लाईट हाऊस, सीगल पक्ष्यांचे बेट आणि खुल्या समुद्रातील डॉल्फिन्सचा मुक्त संचार पाहण्याचा थरार पर्यटकांना अविस्मरणीय अनुभव देतो.

पर्यटकांची वाढती संख्या स्थानिकांसाठी रोजगाराची नवी दारे उघडत आहे. बोटिंग, स्थानिक मार्गदर्शन, खाद्यपदार्थ, वाहन व्यवस्था यामधून अनेकांना हक्काचा रोजगार मिळू लागला आहे.

ग्रामपंचायतीच्या वतीने निवती बंदर आणि मेढा समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांसाठी बाकडी, शौचालये, शुद्ध पिण्याचे पाणी (वॉटर एटीएम), पार्किंग व्यवस्था आणि माहिती फलक उभारण्यात आले आहेत. पुढील काळात पायाभूत सुविधा अधिक मजबूत झाल्यास निवती हे सिंधुदुर्गच्या पर्यटन नकाशावरील प्रमुख केंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe