जगात प्रथमच पुरुषांसाठी गर्भनिरोधक इंजेक्शन !

Marathi News

Marathi News : भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदे (आयसीएमआर) कडून पुरुषांसाठी इंजेक्शनद्वारे दिल्या जाणाऱ्या जगातील पहिल्या गर्भनिरोधक औषधाची वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली आहे. चाचणीमध्ये कोणत्याही गंभीर दुष्परिणामाशिवाय हे औषध सुरक्षित आणि प्रभावी आढळल्याचा दावा आयसीएमआरकडून करण्यात आला आहे.

वैद्यकीय चाचणीमध्ये २५ ते ४० वयोगटातील ३०३ निरोगी पुरुष स्वयंसेवक सहभागी झाले होते. तिसऱ्या टप्प्यातील चाचणी नवी दिल्ली, उधमपूर, लुधियाना, जयपूर आणि खडगपूर या पाच ठिकाणांवरील रुग्णालयांमध्ये घेण्यात आली.

या चाचणीसाठी भारताच्या औषध महानियंत्रक ( डीसीजीआय) आणि संबंधित संस्थात्मक नैतिक समितींकडून परवानगी देण्यात आली होती. चाचणीमध्ये पुरुषांना ६० मिलीग्रॅम ‘रिव्हर्सिबल इनहिबिशन ऑफ स्पर्म अंडर गाईडन्स’ (आरआयएसयूजी) चे इंजेक्शन देण्यात आले होते.

यात हे औषध पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी आढळले आहे. हे दीर्घकाळ काम करू शकते, असे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. ‘एजुस्पार्मिया’च्या स्थितीसंदर्भात आरआयएसयूजीचा एकूण प्रभावीपणा ९७.३ टक्के, तर कोणत्याही गंभीर दुष्परिणामाशिवायचा प्रभाव ९९.०२ टक्के आढळला.

एजुस्पर्मिया ही एक वैद्यकीय संकल्पना असून त्यानुसार विर्यामध्ये कोणतेही व्यवहार्य शुक्राणू नसतात. अभ्यासादरम्यान स्वयंसेवकांच्या पत्नीच्या आरोग्यावर देखील लक्ष ठेवण्यात आले होते.

गर्भनिरोधक औषधाच्या इतिहासात आरआयएसयूजी इंजेक्शन पुरुष आणि महिलांसह सर्व गर्भनिरोधकाच्या तुलनेत सर्वोच्च प्रभावशाली असल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe