अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जगभरात चीन, इटली, अमेरिका, दक्षिण कोरियासह जवळपास १०९ देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी अमेरिकेत प्रथमच राष्ट्रीय गार्डची तैनाती करण्यात आली आहे.
चीननंतर सर्वाधिक ६३१ बळी इटलीमध्ये गेल्याने येथील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. चीनसह जगभरात कोरोनाच्या बळींचा आकडा ४,२५१ इतका झाला आहे. तर १,१७,३३९ जणांना याची लागण झालेली आहे.
ब्रिटनच्या आरोग्यमंत्री नडीन डोरीस यांनी स्वत: आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. कोरोनाची लागण झाल्याने घरातच स्वत:ला कोंडून घेतल्याचे त्या म्हणाल्या. डोरीस या ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सनसह अनेक वरिष्ठ मंत्री व खासदारांच्या संपर्कात आल्याने इतरांनादेखील संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ब्रिटनमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे ६ जण दगावले असून ३७३ जणांना याची लागण झाली आहे. चीनबाहेर इतर देशांमध्ये वेगाने पसरत असलेल्या कोरोनामुळे मध्य अमेरिकेतील राष्ट्र पनामा आणि बेल्जियममध्ये पहिला बळी गेला आहे.
पनामातील ८ रुग्णांपैकी एका ६४ वर्षीय व्यक्तीचा रविवारी मृत्यू झाला. तर बेल्जियममधील २६७ पैकी एक जण दगावला आहे. भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या श्रीलंकेत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. तुर्कीत देखील कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याने दहशत निर्माण झाली आहे.
रोपमधून परतलेल्या एका तुर्की व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. इटलीच्या पर्यटकांच्या संपर्कात आल्याने एका ५२ वर्षीय पर्यटन मार्गदर्शकाला कोरोनाची लागण झाली. इटलीमधील बळींचा आकडा ४६३ वरून मंगळवारी ६३१ झाला आहे.
याठिकाणी कोरोनाच्या रुग्णांची संख्या १० हजारांच्या घरात गेली आहे. बळींचा आकडा वेगाने वाढत चालल्याने इटलीने खबरदारी म्हणून सलग दुसऱ्या दिवशी देशभरातील लोकांवर आणखी निर्बंध लादले आहेत. सार्वजनिक ठिकाणे बंद करत लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com