तुम्हाला माहित आहे सुखी माणसाचे लक्षण काय आहे ?

Ahmednagarlive24
Published:

आपलं काय असतं ना, नकारात्मक गोष्टी माणूस लवकर समजून उमजून त्यांना आपलंसं करतं. पण कुणी सकारात्मक सांगायला आला की, त्याला देखील आणि नकारात्मक भावनेनेच बघतो. कारण आपल्याला आयुष्यात कुठेतरी अपयश आलेले असते आणि नकारात्मकता वाढत जाते.

पण शाळेत शिकवलेले आपण सपशेल विसरून जातो की, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. कारण अपयश आले नाही, तर यशाची किंमत कळणार कशी? सुख देखील असेच असते. आयुष्यात दु:ख मिळाले नाही, तर सुखाची किंमत कशी कळणार?

आता प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी असते. कोणी मोठा बंगला असूनदेखील सुखी नसतो, तर कुणी छोटय़ा झोपडीत राहूनदेखील सुखी असतो. याच्यामुळे सुख नक्की काय असतं, असा प्रश्न पडतो. खरं म्हणजे सुख हे आपल्याला देवाने दिलेले मोठे वरदान आहे.

पण, आपण ते समजून घेत नाही. किंबहुना आपण दु:ख जास्त कवटाळतो. म्हणजे आपणाकडे नाही त्याची कारणे शोधत आपण मनाला दु:खी करतो. जे आपल्याकडे आहे त्यात उपभोग न घेता सुख गमावतो.

सुख मानणं इतकं कठीणदेखील नसतं. माणसाने समाधानी असणे महत्त्वाचे. आजकाल गरजा वाढत आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी माणसाला चोवीस तासदेखील कमी पडतात. पण, त्यातही काही क्षण असतात जे त्याने शोधले, तर क्षणभर का होईना मनाला विश्रांती देऊन ते शांतीचे क्षण सुखाने परिवारासोबत अनुभवू शकतात.

जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो, तेव्हा आपले मन शांत होते आणि नसलेल्या गोष्टींपेक्षा असलेल्या गोष्टींचा विचार करू लागते. मग समजते, आपल्याकडे तर भरपूर काही आहे आणि आपण विनाकारण धावत्या गोष्टींमागे पळत होतो.

सुखी माणसाचे लक्षण समाधानी असते आणि समाधानी असण्याचे उदाहरण म्हणजे, माणसाला शांत झोप लागणे. हे झोप लागणे एवढे कठीणदेखील नाही, पण विचारांनी ही झोपही जाते.

चला तर मग, ‘सुख पाहता जवापाडे, दु:ख पर्वताएवढे’ ही म्हण बदलण्याचा प्रयत्न करू. आहे ते आयुष्यातील सुख उपभोगण्याचा प्रयत्न करून, दु:खाला दूर पळवून लावू.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment