GK News : ग्रहमालेत गोलाकार रिंगणात दिसणारा आणि त्याभोवतालचे शंभराहून अधिक चंद्र यामुळे खगोलतज्ज्ञांचे विशेष आकर्षण असलेला शनी सर्वांच्याच कुतूहलाचा विषय असून शनीभोवती ही कडी कशी निर्माण झाली,
याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता खगोल अभ्यासकांमध्ये अनेक वर्षांपासून आहे. याच उत्सुकतेतून झालेल्या एका संशोधनात शनीभोवती फिरणाऱ्या दोन बर्फाच्छादित चंद्राची धडक होऊन ही गोलाकार कडी निर्माण झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शनी हा नेहमीच विश्वात आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. याचे एक मुख्य कारण म्हणजे शनी ग्रहाला चारही बाजूंनी घेरलेल्या सात कड्या. एवढेच नाही तर शनीकडे चंद्रांची संपूर्ण फौजच आहे. असे म्हटले जाते की,
शनीला एकूण २४५ चंद्र आहेत. गुरूनंतर शनी हा सर्वात मोठा ग्रह आहे. या शनीच्या वलयाच्या गूढतेचे उत्तर आता एका संशोधनातून सापडले आहे. या संशोधनात नासाच्या कॅसिनी मिशनचा डाटा वापरण्यात आला असून कॅसिनी अंतराळ यानाने २००४ ते २०१७ दरम्यान शनीची प्रदक्षिणा केली.
नासाच्या या तपासणीत शनीभोवतीचे रिंगण है बर्फाचे कण असल्याचे समोर आले आहे. बर्फाने आच्छादलेल्या चंद्राच्या धडकेमुळे शनीवर बराच कचरा फेकला गेला आणि त्यातून त्याभोवती वलय तयार झाले असून शनीच्या बर्फाच्छादित चंद्रांमध्येही काही खडक होते, त्यामुळे या वलयात धुळीचेही प्रचंड प्रमाण असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे.