Toll Tax Rule : राज्यातील सर्व टोलनाक्यांवर पिवळ्या रेषे (यलो लाईन) च्या ३०० मीटर अंतरापेक्षा पुढे वाहनांची रांग लागली तर त्या रेषेच्या पुढील सर्व वाहनांना टोलशिवाय सोडले जाईल. तसेच वाहनचालकांचा ४ मिनिटांपेक्षा अधिक वेळ टोलच्या रांगेत गेला तर टोल माफ केला जाईल.
यासाठी टोलनाक्यावर अधिकचे पोलीस मनुष्यबळ लावले जाईल, अशी माहिती मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दिली.
मुंबईतील पाचही एण्ट्री पॉइंटवर पुढील १५ दिवस सरकार आणि मनसेकडून कॅमेरे लावून वाहनांची मोजमाप केली जाईल. ठाण्यात झालेली टोलवाढ मागे घेण्यासाठी सरकारला एक महिन्याची मुदत दिल्याचेही राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्यातील टोलवसुली व त्याअनुषंगाने प्रश्न उपस्थित करत बैठक घेतली होती. या बैठकीनंतर शुक्रवारी सकाळी राज यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी मंत्री भुसे आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
यावेळी राज यांनी मंत्री भुसेंसमवेत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, मुंबई एण्ट्री पॉइंटवरची टोलवाढ आणि एकूणच टोलबद्दलच्या लोकांच्या मनात असलेल्या तक्रारी, राग याला वाचा फोडण्यासाठी मुख्यमंत्र्यासोबत बैठक झाली.
९ वर्षांपूर्वी याच विषयावर मी तत्कालीन मुख्यमंत्र्यांशी बोललो होतो. त्याचवेळी सरकारने टोल कंपन्यांशी आणि बँकांशी केलेले करार २०२६ पर्यंत आहेत. सन २००० सालच्या आसपास झालेल्या या करारात अनेक चुका केल्या गेल्या आहेत.
ज्या सुविधा देऊ असे करारात म्हटले गेले त्या सुविधा दिल्याच गेल्या नाहीत. टोल भरायचा पण रस्ते खराब आहेत अशा परिस्थितीत टोल का भरायचा, हा प्रश्न लोकांच्या मनात आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘चारचाकी वाहनांना टोल माफ आहे’ असे सांगितले. जर टोल माफ आहे तर तो इतकी वर्ष का घेतला गेला, हे आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी विचारायला सुरुवात केली आणि त्यातून काही ठिकाणी संघर्ष झाला, असेही राज ठाकरे म्हणाले.
आजच्या बैठकीत काय काय सुधारणा व्हायला हव्यात यावर चर्चा झाली. गाड्यांची संख्या वाढत असताना टोल वाढणार असेल तर हे चालणार नाही. करारात नमूद केल्याप्रमाणे प्रवाशांना सोयीसुविधा मिळाल्याच पाहिजेत.
स्वच्छ प्रसाधनगृह, प्रथमोचार सेवा, रुग्णवाहिका, क्रेन, प्रकाशयंत्रणा, पोलीस अंमलदार, करारपत्रे, शासननिर्णय प्रत, उड्डाणपूल, भुयारी मार्गाचे ऑडिट आणि टोलबद्दलच्या तक्रारींसाठी मंत्रालयात एक कक्ष, या सुविधा तत्काळ केल्या जातील, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.
आजच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
फास्टटंग चालला नाही तर एकदाच टोल घेतला जाईल. दोनदा टोल घेतला तर वाहनचालक तक्रारी करू शकतील.
– टोल परिसरातील नागरिकाना मासिक पास सतत मिळणार
– टोल नाक्यावर त्या टोलचे कंत्राट किती रकमेचे आहे, टोलची वसुली किती आणि वसुली बाकी किती याचे डिजिटल बोर्ड लावले जातील.
-ठाण्यातील आनंदनगर टोलनाका आणि ऐरोली असा दोनदा टोल भरायला लागतो. आता दोन्हीपैकी एका ठिकाणीच टोल घेतला जाईल. याबाबतचा एक महिन्यात शासन निर्णय.
– मुंबई महापालिकेच्या हद्दीत असणाऱ्या हरी ओमनगर रहिवाशांसाठी तत्काळ पूल बांधला जाईल. जेणेकरून त्यांना टोल न भरता जाता येईल.
– राष्ट्रीय महामार्गावर खड्डे असतील तर त्या ठिकाणचा टोल रद्द करता येतो, अशी कायद्यात तरतूद. त्यामुळे या विषयावर १५ दिवसांत राज्य सरकारसह केंद्र सरकारमधील नितीन गडकरी यांच्याशी बोलणार.
– मुंबई एण्ट्री पॉइंट, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि राजीव गांधी सी-लिंक याचे कॅगकडून ऑडिट व्हावे अशी मनसेची मागणी. अवजड वाहन लेन कटिंग करतात त्यांना तातडीने शिस्त लावावी.