Animal Husbandry:- शेतकरी शेतीला जोड धंदा म्हणून पशुपालन व्यवसाय करतात व या व्यवसायामध्ये दुधाच्या उत्पादनाकरिता गाय व म्हशींचे पालन केले जाते. कारण पशुपालन व्यवसायाच्या जर आपण आर्थिक उत्पन्नाचा आधार म्हटला म्हणजे तर तो दूध उत्पादन हे आहे. त्यामुळे गाई किंवा म्हशीपासून आपल्याला जास्तीत जास्त दुधाचे उत्पादन मिळावे या दृष्टिकोनातून शेतकरी व्यवस्थापन करत असतात.
व्यवस्थापनामध्ये म्हशीचे किंवा गाईंचे आरोग्य व्यवस्थापन खूप महत्त्वाचे ठरते. जर आरोग्य व्यवस्थापनामध्ये ढिसाळपणा झाला तर याचा थेट परिणाम हा दूध उत्पादनावर आपल्याला दिसून येते. त्यामध्ये भारताचा विचार केला तर गाईंच्या तुलनेमध्ये म्हशींचे पालन मोठ्या प्रमाणावर केले जाते.
अशा परिस्थितीत जर म्हशीने कमी दूध देऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला काही सोप्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. याबद्दलची माहिती या लेखात घेऊ.
म्हशीने कमी दूध देऊ नये असे वाटत असेल तर या सोपी गोष्टी करा
1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे म्हशींचे दूध काढताना ते शांत वातावरणामध्ये काढावे. समजा अशा वेळेस जर काही कर्कश आवाज आजूबाजूला असेल तर म्हशी घाबरू शकतात व त्यामुळे त्यांचा रवंथ कमी होतो. यामुळे दुधाचे प्रमाण कमी होते.
2- सकाळी 11 ते दुपारी एक वाजेपर्यंत म्हशींना डूबावयास सोडावे. परंतु जर नुकतीच व्यायलेली म्हैस असेल तर व्यायल्यानंतर सात ते आठ दिवस डुंबावयास सोडू नये. त्यांना गोठ्यामध्येच गार पाणी मारावे.
3- तसेच वेळेवर त्यांना ताजे व स्वच्छ पाणी प्यायला द्यावे व गोठ्यामध्ये म्हशीना व्यवस्थित बसता येईल किंवा आडवे पडता येईल एवढी पुरेशी जागा आवश्यक ठेवावी. जर पुरेशी जागा नसेल तर त्यांना एकमेकांच्या सडावर पाय पडून सडांना इजा होण्याची शक्यता असते.
4- तसेच गोठ्यातील जमीन ही निसरडी नसावी. जर निसरडी जमीन असेल तर म्हशी पाय घसरून पडू शकता तो पायाला इजा होऊ शकते. तसेच निसरड्या जमिनीवरून म्हशींना उठताना मागच्या पायाच्या खूरांचा फटका सडावर किंवा कासेवर बसतो व कासेला इजा होऊ शकते.
5- समजा तुम्ही म्हशीला जर बादलीने पाणी पाजत असाल तर कमीत कमी दिवसातून तीनदा पाणी पाजावे.
6- म्हशीना तुम्ही जे काही रोजचे खाद्य देतात किंवा खाद्य घटक देतात त्यामध्ये अचानकपणे कुठलाही बदल करू नये किंवा दररोजच्या व्यवस्थापनामध्ये अचानक मोठा बदल करू नये. तुम्ही त्यांना जितके प्रेम द्याल किंवा गोंजाराल तेवढेच ती त्या वातावरण व्यवस्थित रूळते व चांगले दूध देते.
7- दूध काढण्यापूर्वी म्हशीला व्यवस्थित पान्हावयास हवे. यामध्ये आपण पान्हवतांना पाठीवर थाप मारणे किंवा शिळ वाजवणे किंवा भिजवलेले आंबोण समोर ठेवणे इत्यादी सवयी जर लावलेल्या असतील तर त्यावर तिचे पान्हवणे अवलंबून असते.
8- तसेच दूध काढताना आंबोन द्यायचे किंवा दूध काढून झाल्यानंतर लगेच द्यायचे यापैकी जी सवय म्हशीला लावलेली असेल त्यावर ती अवलंबून असते. तसेच एकदा म्हशीने पान्हा सोडला की लगेच दूध काढणे गरजेचे आहे.
9- उष्णतेचे वातावरण म्हशींना अजिबात सहन होत न सल्यामुळे वातावरणातील तापमानामध्ये होणारा बदल अंगवळणी पाडण्यासाठी किंवा तो पचवण्याकरिता श्वासोस्वास आणि शरीराचे तापमान यांची सांगड घालण्याकरिता म्हशींना जास्तीचा वेळ लागतो. त्यामुळे शेडच्या अवतीभवती सावली असणारी उंच झाडे लावली तर शेडचे तापमान थंड राहण्यास मदत होते व याकरिता जर शेडच्या किंवा गोठ्याच्या छतावर तापमान कमी होईल अशा काही गोष्टी पसरवल्या तर यामुळे फायदा होतो.