Health Insurance : आजकाल बहुतांश लोक आरोग्याच्या बाबतीत जागरूक झाले आहेत. अनेक लोक हेल्थ इन्शुरन्स घेऊन ठेवतात. जर तुम्ही कोणत्याही कंपनीची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
होय, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) ग्राहकांचे हित लक्षात घेऊन एक नवीन आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार विमा कंपनीला ग्राहकांसाठी ग्राहक माहिती पत्रक (सीआयएस) सोपे करण्यास सांगण्यात आले आहे.
याअंतर्गत विमा कंपनीला विम्याची रक्कम आणि पॉलिसीमध्ये समाविष्ट केलेला खर्च, क्लेम करताना लागणारी सर्व माहिती अशी पॉलिसीची मूलभूत माहिती द्यावी लागणार आहे.
* 1 जानेवारी 2024 पासून लागू होईल हा नियम
1 जानेवारीपासून ग्राहकांना याची माहिती विहित नमुन्यात मिळणार आहे. आयआरडीएआयने ग्राहकांना सर्व काही समजावून सांगण्यासाठी विद्यमान ग्राहक माहिती पत्रकात (सीआयएस) बदल केले आहेत.
यासंदर्भात सर्व विमा कंपन्यांना पाठवलेल्या पत्रात विमा नियामकाने म्हटले आहे की, नवीन सीआयएस 1 जानेवारी 2024 पासून लागू होईल. पॉलिसीधारकाने खरेदी केलेल्या पॉलिसीच्या अटी आणि शर्ती त्याने समजून घेणे महत्वाचे असल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे.
पत्रात म्हटले आहे की, “ग्राहकांना पॉलिसीशी संबंधित कागदपत्रे समजणे कठीण होऊ शकते. अशा वेळी कागदपत्रे असे असावीत की जेणे करून पॉलिसीशी संबंधित मूलभूत माहिती सोप्या शब्दात समजावून सांगितली जाईल. त्यात सर्व माहिती असावी.
परिपत्रकानुसार, पॉलिसीशी संबंधित मुद्द्यांमध्ये विमा कंपनी आणि पॉलिसीधारक यांच्यात फरक पडल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन बदलांसह सीआयएस जारी करण्यात आला आहे.
नव्या CIS मध्ये कंपनीला इंश्योरेंस प्रोडक्ट /पॉलिसीचे नाव, पॉलिसी क्रमांक, विमा उत्पादनाचा/पॉलिसीचा प्रकार आणि विम्याची रक्कम याची माहिती द्यावी लागणार आहे. याशिवाय पॉलिसीधारकाला पॉलिसीमध्ये समाविष्ट खर्च, बहिष्करण,
प्रतीक्षा कालावधी, कव्हरेजची आर्थिक मर्यादा, क्लेम प्रक्रिया आणि तक्रार निवारण प्रणालीची माहिती दिली जाईल. परिपत्रकानुसार विमा कंपनी, मध्यस्थ आणि एजंट यांना बदललेल्या सीआयसीचा तपशील पॉलिसीधारकांना पाठवावा लागणार आहे.
* ग्राहकांना फायदा
अनेकदा अनेक हेल्थ इंशुरन्स कंपन्या यांच्या माहिती पत्रकात संपूर्ण योग्य माहिती नसल्याने पॉलिसी घेऊनही अनेक अडचणींचा सामना करत होते. परंतु आता या नव्या नियमानुसार फसगत होण्याची शक्यता बहुतांशी कमी होईल.