Interesting facts Moon : भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान ३ ने गेल्या शनिवारी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चांद्रयानावरील कॅमेरा इस्रोने कार्यान्वित केला.
या कॅमेऱ्याने चांद्रयानाचा जो पहिला फोटो पृथ्वीवर पाठवला त्यामध्ये चंद्राच्या भूमीवर खड्डेच खड्डे दिसून आले आहेत. हे असे काही पहिल्यांदाच पाहिले गेलेले नसले तरी चंद्राच्या पृष्ठभागावरील या खड्डड्यांबाबत खगोलप्रेमींमध्ये पुन्हा एकदा कुतूहल निर्माण झाले आहे.

चंद्रावर हे खड्डे कधी आणि कसे तयार झाले, अशा खड्डेमय भूमीवर चांद्रयान ३ अलगत अवतरण (सॉफ्ट लँडिंग) करू शकेल का, असे प्रश्न नव्याने चर्चेला आले आहेत. खरेतर चंद्राच्या भूमीवरील या खड्यांची माहिती कित्येक वर्षांपासून वैज्ञानिकांना आहे. या खड्यांपैकी बहुतांश खड्डे हे मोठ मोठ्या उल्का आदळल्यामुळे निर्माण झाले आहेत.
या विशाल ब्रह्मांडातील चंद्र हा पृथ्वीचा सर्वात जवळचा शेजारी आहे. सुमारे साडेचारशे वर्षांपासून चंद्र आणि पृथ्वीचे अनोखे नाते आहे. या दोन्हींवर अवकाशातून मोठ्ठाल्या उल्का कोसळल्या आहेत. त्यामुळे हे खड्डे निर्माण झाले आहेत.
वैज्ञानिक अशा खड्ड्यांना ‘इम्पॅक्ट क्रेटर’ असे म्हणतात. पृथ्वीवर आजवर असे १८० इम्पॅक्ट क्रेटर सापडले आहेत. चंद्रावर हीच संख्या तब्बल १४ लाखांहून जास्त आहे. चंद्रावर ना पाणी आहे आणि पृथ्वीसारखे वातावरणही नाही.
त्यामुळे पृथ्वीवरील क्रेटर्स जसे कालांतराने भरले गेले तसे ते चंद्रावरील क्रेटर्सबाबत होत नाही, म्हणून हे क्रेटर्स कोट्यवधी वर्षांपासून जशास तसे आहेत.