रशियाच्या लुनाने केला चंद्रावर मोठा खड्डा !

Marathi News : रशियाच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यापूर्वीच नियंत्रण हुकल्यानंतर कोसळलेल्या ‘लुना २५’ यानामुळे चंद्रावर मोठा खड्डा पडल्याचा दावा नासाने केला. गत महिन्यातील या दुर्घटनेनंतरची काही छायाचित्रेही जारी करताना नासाने हे निरीक्षण मांडले आहे.

जवळपास ४७ वर्षांच्या कालावधीनंतर रशियाने प्रथमच ‘लुना २५’ हे यान चांद्रमोहिमेवर पाठविले होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यापूर्वी तांत्रिक बिघाडामुळे या यानाचे नियंत्रण हुकले. परिणामी १९ ऑगस्ट रोजी हे यान चंद्रावर कोसळल्याने रशियाचे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरण्याचे स्वप्न भंगले होते.

या यानाच्या चंद्रावरील दुर्घटनास्थळाची काही छायाचित्रने अमेरिकन अंतराळ संस्था अर्थातच नासाने जारी केली आहेत. यान कोसळल्याने चंद्राच्या पृष्ठभागावर १० मीटर व्यासाचा गोल खड्डा पडल्याचा दावा नासाने या छायाचित्रांच्या आधारे केला आहे.

अमेरिकेच्या राष्ट्रीय एअरोनॉटीक्स व अंतराळ प्रशासनाच्या चंद्रावर निगराणी करणाऱ्या ऑर्बिटरने ही छायाचित्रे पाठविली आहेत. चंद्रावरील एका विशिष्ट ठिकाणी नव्याने तयार झालेला खड्डा या ऑर्बिटरने टिपला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe