डासांमुळे फैलाव होणाऱ्या मलेरिया व डेंग्यूसारख्या आजारांनी हैराण असलेल्या भारतासह जगातील अनेक देशांसाठी एक खूशखबर आहे.
मेलबर्न आणि ग्लासगो विद्यापीठांतील शास्त्रज्ञांनी हल्लीच एक अनोखे तंत्रज्ञान विकसित केले असून ते डासांना न मारताच त्यांच्यात अस्तित्वात असलेला डेंग्यूचा व्हायरस पसरू देणार नाही.
एवढेच नाही तर झिका व्हायरसवरही हे तंत्रज्ञान सारखेच प्रभावी आहे. शास्त्रज्ञांनी सांगितले की, जगभरात डेंग्यूच्या रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी वल्बाचियाचा शोध लावला असून तो डेंग्यूसारख्या तापाचा फैलाव रोखण्यासाठी एक ह्युमन फ्रेंडली बॅक्टेरिया आहे.
वल्बाचियाच्या स्ट्रेनचा उपयोग करून डासांना डेंग्यू व्हायरस स्थानांतरित करण्यापासून रोखले जाऊ शकते. यामुळे मानवात डेंग्यूसारख्या घातक तापाचा फैलाव होणार नाही. खरेतर वल्बाचिया बॅक्टेरिया डासांमधील डेंग्यूचा फैलाव करणाऱ्या व्हायरसचा खात्मा करते.
अर्थात गेल्या सुमारे ५० वर्षांमध्ये डासांमुळे पसरणाऱ्या आजारांसोबत लढण्यासाठी शेकडो तंत्रज्ञान वेगवेगळ्या देशांनी विकसित केली आहेत. मात्र डेंग्यूच्या मुकाबल्यासाठी ही पद्धत खास ठरू शकते. या तंत्रज्ञानाची शास्त्रज्ञांनी जिथे जिथे चाचणी घेतली, त्यांना त्यात ७० टक्क्यांपेक्षा जास्त सफलता मिळाली.