दुबई : आखातातील अजरबेजान देशातील नाफतलान शहरामध्ये एक असे आरोग्य केंद्र आहे, जिथे लोक चक्क खनिज तेलाने भरलेल्या बाथटबमध्ये स्नान करतात. अशा स्नानामुळे ७०पेक्षा जास्त आजार दूर होतात, असा दावा केला जातो.
या आरोग्य केंद्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, खनिज तेल न्यूरोलॉजिकल व त्वचेच्या समस्यांवर खास लाभदायक आहे. तिथे स्नान करण्यासाठी रशिया, कजाकिस्तान, जर्मनीसह विविध देशांतून लोक येतात.
विशेष म्हणजे अजरबेजान तेलची निर्यात करणाऱ्या प्रमुख देशांपैकी एक आहे. त्वतेच्या विकारांसोबतच लोक तिथे आर्थरयटिस व नसांचे रोग दूर करण्यासाठीही येतात. खनिज तेलाचा वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जातो, मात्र सर्वात लोकप्रिय पद्धत स्नान हीच आहे.
त्यासाठी रुग्ण सुमारे ४० अंश सेल्सियस तापमानावर १३० लीटर तेलामध्ये आंघोळ करतात. गरम तेला स्नान केल्याने सांधेदुखीतून दिलासा मिळाल्याने अनेकजण सांगतात. परंतु, खनिज तेलात असलेल्या विविध प्रकारच्या रसायनांमुळे जास्त वेळ स्नान केल्यास शरीरावर दुष्प्रभावही पडू शकतो.
एवढेच नाही तर मृत्यूही होऊ शकतो. आरोग्य केद्रातील तज्ज्ञांनी मात्र हा आक्षेप खोडून काढला आहे. आजवर हजारो लोक उपचार करून गेले आहेत, पण एकाही व्यक्तीला हानी पोहोचलेली नाही, असे ते सांगतात.
रुग्णाला दिवसातून एकदाच स्नान करण्याची मुभा दिली जाते व तीही फक्त दहा मिनिटे, असेही त्यांनी स्पष्ट केले. खनिज तेलात स्नान करण्याचा हा कोर्स दहा दिवसांचा असतो.