Science News : शास्त्रज्ञांनी ४६ हजार वर्षांपूर्वी गोठलेल्या एका कीटकाला पुन्हा जिवंत केले आहे. जेव्हा पृथ्वीवर महाकाय मॅमथ, मोठे दात असलेले वाघ आणि महाकाय एल्क यांचे राज्य होते, तेव्हा हे कीटक अस्तित्वात होते.
‘मॅक्स प्लॅक इन्स्टिट्युट ऑफ मॉलेक्युलर सेल बायोलॉजी अँड जेनेटिक्स’ या संस्थेतील प्रोफेसर एमेरिटस टेमुरस कुर्जचालिया म्हणतात की, हा राऊंडवर्म सायबेरियन पर्माफ्रॉस्टमध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या ४० मीटर खोल हायबरनेशनमध्ये जगत होता.

ही प्रजाती आजवर अज्ञात होती. तो ज्या प्रकारे जगला त्याला क्रिप्टोबायोसिस म्हणतात. क्रिप्टोबायोटिक अवस्थेतील जीव पाणी किंवा ऑक्सिजनच्या पूर्ण अनुपस्थितीत जगू शकतात. तसेच अत्यंत थंड तापमानासह अत्यंत खारट परिस्थितीतही टिकून राहू शकतात.
कुर्जचालिया म्हणतात की, मृत्यू आणि जीवन यांच्या दरम्यानची ही स्थिती आहे. ज्यामध्ये चयापचय क्रिया अत्यंत शिथिल होते. ज्यामुळे प्राणी फार वर्षे न खाता-पिता जिवंत राहू शकतात. हा एक मोठा शोध असल्याचे सांगताना ते म्हणाले की, कोणताही जीव या परिस्थितीत आपले जीवन थांबवू शकतो आणि नंतर पुन्हा सुरू करू शकतो.
या कीटकाचे वय किती आहे, हे जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी रेडिओकार्बन तंत्राचा अवलंब केला. त्यामध्य हा कीटक सुमारे ४६ हजार वर्षांपूर्वीचा असल्याचे आढळून आले. तथापि अद्याप शास्त्रज्ञांना हा कीटक नेमक्या कोणत्या प्रजातीचा आहे,
याचा उलगडा होऊ शकलेला नाही. शास्त्रज्ञांनी या कीटकाचे आनुवंशिक विश्लेषण केले. त्यातून असे आढळून आले की, ही आतापर्यंत अज्ञात असलेली नवी प्रजाती आहे. शास्त्रज्ञांनी या प्रजातीचे नाव ‘पॅनाग्रोलाईमस कोलीमनीस’ असे ठेवले आहे.