प्रा. डॉ. महेबूब सय्यद (न्यू आर्टस, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहिल्यानगर) : बाल वाङमय हा आपल्याकडे सर्वात दुर्लक्षित वाङमय प्रकार आहे. वास्तविक पाहता सहज आणि सोपं लिहिणं हे कठीण असतं. त्या तुलनेत अवघड लिहणं हे सोपं असतं.
भाषेचा फुलारा, वाक्यांची आताषबाजी, शब्दांचं माधुर्य, उपमा उत्प्रेक्षा आणि अलंकारांचा भडीमार केला की साहित्य लिहिता येतं; असा आपल्याकडे समज आहे. असो. तर आपल्या बाल वाङमयात राजा राणीच्या कथा, परी आणि राक्षस यांच्या अद्भूत कथा येतात. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बाल मानसशास्त्र आलेले नसते. याला काही अपवाद आहेत, नाही असं नाही. आपलं मराठी साहित्य हे मध्यवर्गीय जाणिवेनं भारलेलं आहे. त्याचेच प्रतिबिंब मराठी बाल वाङमयात देखील पडलेलं आहे. परिणामी आपलं बालवाड्मयही मध्यमवर्गीय जाणिवेने लिप्त आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/garlic-benifits-3.jpg)
अशा पार्श्वभूमीवर सचिन मोहन चोभे यांचे ‘टग्या टिगीच्या करामती’ हा बालकथा संग्रह वाचण्यात आला. कलावंत हा संवेदनशील मनोवृत्तीचा प्राणी असतो. कलावंताच्या आजूबाजूच्या भावभावनेचं प्रतिबिंब कलावंताच्या कलाकृतीमध्ये अपरिहार्यपणे उमटत असतं असं मानलं जातं. या दृष्टीने पाहू गेल्यास उपरोक्त बालकथा संग्रह या कसोटीस पूर्णपणे उतरतो. सचिन मोहन चौभे हा शेतकरी कष्टकरी कुटुंबातून आलेला चिंतनशील तरुण आहे. शिक्षणासाठी आणि पुढे उपजीविकेसाठी शहरात आल्यानंतरही त्यांने शेतीशी असलेली आपली नाळ तुटू दिली नाही. त्याचे शेतीमातीशी जैविक नाते आहे, त्यातूनच त्याने विविध वृत्तपत्रातून शेतकऱ्यांचे आणि शेतमालाचे प्रश्न सतत मांडलेले आहेत. शेतकऱ्यांच्या या भौतिक प्रश्नांना भिडत असतानाच त्याच्या मनातील लहान मुल कायम जिवंत आहे. त्यामुळे त्याने जाणीवपूर्वक लहान मुलांना लक्ष्य करत बालकथा लिहिलेल्या आहेत. आणि हो। त्या कथा राजा राणीच्या कथा नाहीत. कारण ‘राजाराणी की कहानी तो पुरानी हो गई।’ म्हणूनच त्याने शेतकऱ्याच्या भावविश्वाशी संबंधित असलेल्या ‘टग्या टिगीच्या करामती’ लिहिल्या. या करामती लिहिताना त्याची मुलं म्हणजे प्रेरणा (दिदुली) आणि पृथ्वीराज (गणुली) हेच त्याचे पहिले श्रोते/वाचक बनले. किंबहुना या मुलांनीच यातील पात्रांचेही नामकरण केले.
सचिनचे शेतीशी जैविक नाते असल्यामुळे शेतकऱ्यांचा गोतावळाच त्याने या कथांमधून रेखाटला आहे. गरीब शेतकऱ्याच्या प्रपंचाला कोंबड्या,शेळ्या-मेंढ्या हातभार लावत असतात. सचिनच्या घरात शेळ्यांचा गोठा होता. त्यानं स्वतः काही काळ शेरूडक्या म्हणजे शेळ्या राखण्याचे/वळण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांने या शेळ्या-कोंबड्यानाच आपल्या कथेचे नायक केले आहे. हा कथासंग्रह म्हणजे त्याने सांभाळलेल्या त्या शेळ्यांचेच भावविश्व आहे, असे म्हटले तर फारसे वावगे ठरणार नाही. या शेळ्या आणि करडं आपल्या आजूबाजूच्या माणसांकडे कसे पाहत असतील याचे जिवंत चित्रण त्याने प्रस्तुत कथासंग्रहात केलेले आहे.
या कथांमधून त्याने शेळ्या-करडं, कोंबड्या, कुत्रे इत्यादी प्राण्यांचे भावजीवन, त्यांचे खाणे-पिणे, त्यांचे जगणे हे चित्रमय शैलीत सांगितले आहे. हे वाचत असताना टग्या टिगीच्या सोबतीनं आपणही मोठे होत जातो. यामध्ये त्याने केवळ गोष्टी सांगितल्या नाहीत तर बदलत्या शेतीच्या हंगामाची माहिती देखील दिलेली आहे. त्यासोबतच शेळ्या करडं, कोंबड्या, इत्यादींच्या माध्यमातून तो काही संदेशही देतो. म्हणूनच या कथा वाचताना आपल्याला ‘गुणाढ्य’च्या पंचतंत्रातील कथांची आठवण येते.
यातील ‘टिगीने केलाय मस्तच प्लॅन’ या पहिल्याच कथेत टिगी रानात जाण्याचा कसा प्लॅन करते? आणि तो अयशस्वी कसा होतो? याचे चित्रण येते. पण याच कथेत प्लॅन अपयशी झाला म्हणून नाराज व्हायचे नाही हेही आपल्याला सांगितले आहे. तर ‘भटक्याला दाखवला झटका’ या कथेच्या माध्यमातून सर्वांना सोबत घेत म्हणजेच एकीचे बळ दाखवत संकटाला कशाप्रकारे सामोरे जायचे हे दाखवले आहे. ‘बागी कोंबडा झाला रडोबा’ या कथेत टग्या टिगीने बागी कोंबड्याला कसा धडा शिकवला हे दर्शवत सत्तेचा माज कसा उतरवता येतो, हे सांगितले आहे. कोंबडीच्या पिलासाठी त्रासदायक असलेल्या घारीचा हल्ला टग्या टिगी कशाप्रकारे परतून लावतात हे आपण ‘घारीची उतरवली शिरजोरी’ या कथेत पाहू शकतो. तर ‘….. आणि चिऊताईची झाली मज्जा’ व ‘भटक्या बागीची नाहीच शिजली डाळ’ या दोन्ही कथांच्या माध्यमातून गोठा आणि शेतातील कांदा काढणे या दोन्हींचे चित्रण सारख्याच पद्धतीने केलेले दिसते. ‘पोळा’ या सणाला शेतकऱ्याच्या जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे.
त्याचे चित्रण ‘रंगला मस्त होता पोळा, मनीमाऊपुढे सगळेच गोळा…!’ यामध्ये केलेले आहे. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर जन्मलेल्या टग्या टिगीच्या आयुष्यातील हा पहिलाच पोळा असतो. या पोळ्याच्या निमित्ताने शेतकरी आपल्या शेतात राबणाऱ्या आणि आपल्याला मदत करणाऱ्या पाळीव प्राण्यांच्या बाबतीत कृतज्ञता व्यक्त करत असतो. म्हणूनच या कथेत केवळ करडं येत नाहीत तर त्यासोबतच कुत्री, मांजरं, गाय-बैल देखील येतात. मांजरीला वाघाची मावशी म्हटले जाते. या वाघाच्या मावशीद्वारे निरनिराळे मित्र-मैत्रिणी जोडण्याचा संदेश लेखक आपणाला या कथेतून देताना दिसतो. त्या सोबतच आनंद हा सगळ्यांनी मिळून घ्यायचा असतो, सण हा सगळ्यांनी मिळून साजरा करायचा असतो. हा महत्त्वपूर्ण संदेशही यातून आपल्याला मिळतो. पोळा झाला आता दिवाळी आली. अलीकडच्या काळात दिवाळी साजरी करणे म्हणजे कानठळ्या बसवणारे फटाके फोडणे ही फॅशन झाली आहे. याबद्दलची नापसंती व्यक्त करत लेखक घरात/गोठ्यात अचानक येणारा नाग आणि त्याला लोकांनी दिलेला प्रतिसाद याचे चित्रण ‘नागोबाचा करून टाकला फुस्सकोबा’ या कथेत करतो. तर ‘कावळोबा झाला काळबुंद रडोबा’ या कथेत कावळा हा पक्षी येतो. येथे लेखकाने मराठी भाषेला लालबुंद सारखा काळबुंद असा नवाच शब्द दिला आहे. ‘शेवटच्या दाढीवाला आला… पण डोकं चोळत गेला’ या कथेत टग्या, टिगी, झिपरी, झिपऱ्या, मोत्या, इत्यादी सर्वजण मिळून टोपीवाला आणि दाढीवाला यांना कसा धडा शिकवतात याचे चित्रण येते.
खेड्यातील निसर्ग, शेतकरी, ग्रामीण संस्कृती यांचे मनोवेधक चित्रण करत लेखकाने आपल्याला ‘टग्या टिगीच्या करामती’ दाखवल्या आहेत. या दहाही कथांच्या माध्यमातून लेखकाने वाचकांना सतत काही ना काही संदेश दिलेला आहे. अत्यंत चित्रमय शैलीत टग्या टिगीच्या सोबतच झिपऱ्या, झिपरी, मोत्या, बागी कोंबडा, भटक्या कुत्रा, घार, खारुताई, इत्यादींचेही वर्णन येते. या 84 पानाच्या पुस्तकाची बांधणी अत्यंत आखीव रेखीव आहे. चित्रकार राजकुमार गुरव यांनी टग्या टिगीच्या भावविश्वाला साजेशी अशी एकूण 34 रेखाचित्र रेखाटली आहेत. पुस्तकाचा आकार, त्याची बांधणी आणि कथेच्या प्रसंगानुरूप असलेली ही रेखाचित्रे यामुळे वाचक एका वेगळ्याच विश्वात रममाण होतो.
अशा अनमोल असलेल्या या पुस्तकाचे मूल्य अवघे एकशे पन्नास रुपये ठेवून कृषी रंग प्रकाशनाने देखील मराठी बाल वाड्मयाच्या क्षेत्रातील आपला वाटा उचलला आहे. याबद्दल प्रकाशक माधुरी सचिन चोभे यांचे विशेष आभार. लेखक सचिन मोहन चौबे यांचे ‘टग्या टिगीच्या करामती’ हे लहान मुलांसाठीचे पहिलेच पुस्तक आहे. सदर पुस्तक वाचकांनी विकत घेऊन वाचावे आणि सचिन मोहन चौभे यांनी यापुढेही सतत लिहित रहावे यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा.