Social Media : तुम्ही जर सोशल मीडिया वापरत असाल तर त्याचा प्रभाव आणि पोहोच याबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे. तसेच सोशल मीडिया वापरणे आवश्यकच असेल, तर त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याचीही तयारी असली पाहिजे, असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेच्या सुनावणीवेळी मांडले.
दाक्षिणात्य अभिनेते आणि तामिळनाडूतील माजी आमदार एस. व्ही. शेखर यांनी २०१८ साली एका महिला पत्रकाराविरोधात आक्षेपार्ह भाषेत टीका असलेली एक फेसबुक पोस्ट शेअर केली होती. याप्रकरणी त्यांच्याविरोधात अनेक खटले दाखल करण्यात आले होते.

तामिळनाडूत विविध ठिकाणी दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी करणारी याचिका शेखर यांनी दाखल केली होती. न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती पी. के. मिश्रा यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली. त्याचवेळी सोशल मीडियाच्या वापरावरून आपले निरीक्षणही नोंदवले. जर एखादी व्यक्ती सोशल मीडिया वापरत असेल तर त्या व्यक्तीने सोशल मीडियाचा प्रभाव, पोहोच याबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
सोशल मीडियाचा वापर अनिवार्य नाही, मात्र जर तुम्हाला सोशल मीडिया वापरणे आवश्यकच असेल तर त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याचीदेखील तुमची तयारी असली पाहिजे, असे खंडपीठ म्हणाले. शेखर यांनी नजरचुकीने आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याचे त्यांच्या वकिलाचे म्हणणे होते.
शेखर यांनी ज्या दिवशी ती फेसबुक पोस्ट शेअर केली, तेव्हा त्यांनी डोळ्यात औषध टाकले होते. त्यामुळे त्यांनी त्या पोस्टमधील मजकूर व्यवस्थित वाचला नव्हता. तसेच आपली चूक लक्षात येताच शेखर यांनी ती पोस्ट डिलीट केली आणि माफीदेखील मागितली, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलाने सुनावणीवेळी केला.
मात्र खंडपीठाने हा युक्तिवाद फेटाळून लावत कायदेशीर कारवाईपासून शेखर यांना दिलासा देण्यास नकार दिला. यापूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने देखील शेखर यांच्याविरोधातील कारवायांना स्थगिती देण्यास नकार दिला होता.