Cervical Cancer : प्रसिद्ध मॉडेल आणि लॉकअप स्टार पूनम पांडेच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. पूनम पांडेच्या टीमने तिचा मृत्यू सर्वायकल कॅन्सर (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) या गंभीर आजाराने झाल्याचे सांगते. ही बातमी जरी खोटी असली तरी देखील सर्वत्र एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे सर्वायकल कॅन्सर म्हणजे काय? आणि याची लक्षण काय आहेत.
खरंतर 2 फेब्रुवारी पूनम पांडेच्या सोशल मीडिया हँडलवर तिच्या मृत्यूची बातमी आली, आणि मृत्यूचे कारण सर्वायकल कॅन्सर असे सांगण्यात आले. पण दुसऱ्या दिवशी अभिनेत्री जगासमोर आली आणि तिने तिच्या मृत्यूची बातमी फेटाळून लावली, आणि आपण हे सगळं लोकांना सर्वायकल कॅन्सर बद्दल समजावं आणि जागरूकता निर्माण व्हावी म्हणून अशी बातमी पसरवल्याचे तिने सांगितले. अभिनेत्रीच्या या खोट्या बातमीमुळे आता सर्वायकल कॅन्सर काय आहे? आणि त्यावर काय उपाय आहे लोकांना जाणून घ्यायचे आहे. आज आपण याच आजाराबद्दल बोलणार आहोत, चला तर मग…

सर्वायकल कॅन्सर (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) म्हणजे काय?
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा स्तनाच्या कर्करोगानंतरचा दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे. हा एक जीवघेणा आजार आहे, यावर योग्य वेळी उपचार मिळाल्यास तो टाळता येऊ शकतो. महिलांच्या गर्भाशयाच्या खालच्या भागात असलेल्या या पेशी गर्भाशय ग्रीवामध्ये वेगाने विकसित होतात.
जाणकार डॉक्टरांच्या मते, भारतातील महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग हा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आहे म्हणजेच सर्वायकल कॅन्सर. या आजाराबाबत वेळीच जागरूकता ठेवली तर मृत्यूही टाळता येऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2019 मध्ये भारतातील सुमारे 45 हजार महिलांचा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला. आता त्याची लक्षणे काय आहेत पाहूया…
त्याची लक्षणे काय आहेत?
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लक्षणे सुरुवातीला ओळखणे कठीण होऊ शकते. हा रोग कालांतराने वाढतो तेव्हा शरीरातील काही बदलांद्वारे ओळखता येतो-
– मूत्रात रक्त येणे
– वारंवार लघवी होणे, लघवीवरील नियंत्रण सुटणे.
– असामान्य रक्तस्त्राव
– सेक्स दरम्यान तीव्र वेदना
– पाठदुखी किंवा ओटीपोटात दाब
– पोटात क्रॅम्प सारखी वेदना
– मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्त्राव
सर्वायकल कॅन्सर (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) कसा टाळायचा?
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी, नियमित तपासणी आणि लसीकरण करणे आवश्यक आहे. एचपीव्ही लसीकरण गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. हा कर्करोग टाळण्यासाठी फक्त एकाच जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवा. याशिवाय सुरक्षित सेक्स महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला अगदी थोडासा बदल दिसला तर तुमच्या स्त्रीरोग तज्ञाशी बोला.