उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पद्मभूषण,पद्मश्री पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे अभिनंदन

Ahmednagarlive24
Published:

मुंबई: केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांना व्यापार व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर विविध क्षेत्रातील 12 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले.

पद्मश्री पुरस्कार सुरेश वाडकर, पोपटराव पवार,श्रीमती राहीबाई पोपेरे, डॉ. रमण गंगाखेडकर, करण जोहर, श्रीमती एकता कपूर, श्रीमती सरिता जोशी, कंगना रानावत, अदनान सामी, झहिरखान बख्तीयारखान,डॉ. सॅड्रा डिसुझा, सय्यद मेहबूब शहा कादरी उर्फ सय्यदभाई यांना जाहीर झाले असून यांचे उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले, महाराष्ट्र्रातील पद्म पुरस्कार विजेत्यांनी महाराष्ट्राची मान देशात उंचावली आहे. या सर्व विजेत्यांच्या कर्तृत्वाचा आज योग्य सन्मान झाला. कर्तृत्ववान माणसांमुळे कोणत्याही राज्याची ओळख होत असते. महाराष्ट्राने आजवर देशाला किर्तीवंत माणसं दिली आहेत.

आज पुरस्कार प्राप्त झालेल्या प्रत्येकाने आपलं आयुष्य लोकहितासाठीसाठी समर्पित केलं आहे. आरोग्य,कला,साहित्य, सामाजिक कार्य अशा अनेक क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रातील व्यक्तींचा आजचा सन्मान सर्वांना अभिमान वाटणारा आणि आनंद देणारा आहे.

पुरस्कारप्राप्त व्यक्ती प्रत्येकाचा प्रेरणास्रोत म्हणून यापुढेही जनतेची सेवा करतील याची मला खात्री आहे. यांचा आदर्श तरुण पिढी घेईल आणि राज्याचं नाव मोठं करतील,असा मला विश्वास आहे. पुरस्कार प्राप्त मान्यवरांचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment