राज्यातील शेतकरी, कष्टकरी, उपेक्षितांच्या उन्नतीसाठी राज्य शासन बांधिल – उपमुख्यमंत्री अजित पवार

Ahmednagarlive24
Published:

पुणे :शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून राज्यातील शेतकरी, कष्टकरी, गरीब, वंचित, उपेक्षितांच्या उन्नतीसाठी राज्य शासन बांधिल आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त शिवाजीनगर पोलीस परेड ग्राउंड येथे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्‍या हस्‍ते मुख्‍य शासकीय ध्‍वजारोहण झाले, यावेळी ते बोलत होते. देशाच्या जडणघडणीत सर्व देशवासियांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या सर्व स्वातंत्र्यवीरांचे आणि स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग आपण सदैव स्मरणात ठेवायला हवा, असे सांगून कार्यक्रमाच्या सुरुवातीला पद्म पुरस्कार, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित तसेच पेालिस व अग्निशमन सेवा पदक प्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करुन पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांनी प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर टाळणे अत्यंत गरजेचे आहे.

आजपासून ‘प्लास्टिक पिशवी मुक्त महाराष्ट्र संकल्प अभियान’ सुरु करण्यात येत असून हे अभियान यशस्वी होण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे.  सर्वांच्या सहकार्यातून ही लोकचळवळ यशस्वी करावी, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम,  पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आदी उपस्थित होते. यावेळी श्री. पवार यांनी विविध पथकांची पाहणी करुन मानवंदना स्वीकारली. यावेळी राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त व विशेष सुरक्षा पदक प्राप्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले .

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment