12th Exam 2024 : यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या काळात, तर दहावीची परीक्षा १ मार्च ते २६ मार्च या काळात होणार आहे.
बारावीसाठी एकूण ११०, तर दहावीसाठी १८१ परीक्षा केंद्र असतील. यात १२ वीसाठी ६४ हजार ०४७ परीक्षार्थी आहेत. तर १० वीसाठी ६८ हजार ८९७ परीक्षार्थी आहेत.
त्या अनुषंगाने या सर्व परीक्षा निर्भय वातावरणात व कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली आहे. यावेळी संवेदनशील परीक्षाकेंद्रांवर सीसीटीव्हीची करडी नजर राहणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून देखील याबाबत आढावा घेण्यात आला असून, त्यांनी या परीक्षांच्या अनुषंगाने परीक्षा केंद्रावर कॉपी होणार नाही, याची सर्वच यंत्रणांनी खबरदारी घ्यावी. जर केंद्रावर कॉपी झालेली आढळली तर केंद्र संचालकांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांनी दिले आहेत.
नुकताच दहावी बारावी परीक्षांच्या अनुषंगाने तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी सालिमठ यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलिस अधीक्षक राकेश ओला, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक कडूस, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील आदी उपस्थित होते.
परीक्षा कालावधीत जास्तीत जास्त परीक्षा केंद्रांना भेटी देण्यात याव्यात, उपद्रवी केंद्रांना परीक्षा कालावधीत विशेष करून भेटी देऊन गैर प्रकारास आळा घालावा, प्रत्येक परीक्षा केंद्रावर तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्या भेटी व्हाव्यात,
या पथकाने परीक्षा तणावमुक्त वातावरणात पार पडतील, असे प्रयत्न करण्याचे आदेश त्यांनी दिले. परीक्षा काळात भरारी पथके तसेच पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात येणार असल्याचे या बैठकीत सुचीत केले आहे.
जिल्हास्तरावर सात भरारी पथके
परीक्षेत गैरप्रकाराला आळा बसावा म्हणून जिल्हास्तरावर ७ भरारी पथके तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय गणित, इंग्रजी या विषयांच्या पेपरला प्रत्येक परीक्षा केंदावर गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत बैठे पथक नियुक्त केले जाणार आहे. गणित, इंग्रजी या पेपरच्या दिवशी संवेदनशील केंद्रांवर व्हिडीओ चित्रीकरण देखील केले जाणार आहे.