१५ व्हिडीओ, ८ फोटो आणि कबुली! संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा खुलासा

Published on -

Beed News : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली होती. ९ डिसेंबर २०२४ रोजी घडलेल्या या घटनेत संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करत हत्या करण्यात आली.

या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याने अखेर पोलिसांच्या चौकशीत आपला गुन्हा कबूल केला आहे. आपण आपल्या साथीदारांच्या मदतीने संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याचे त्याने तपास यंत्रणेसमोर मान्य केले आहे. गुरुवारी एका वृत्तवाहिनीने या संदर्भात सविस्तर अहवाल प्रसिद्ध करत हा दावा केला आहे.

सुदर्शन घुले याने दिलेल्या जबाबातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. त्याने सांगितले की, खंडणी प्रकरणात संतोष देशमुख अडथळा ठरत होते, त्यामुळे त्यांना कायमचा धडा शिकवण्याचा आदेश आपल्याला मिळाला होता.

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बुधवारी ही माहिती न्यायालयात सादर केली होती. त्यानंतर गुरुवारी सुदर्शन घुले आणि इतर दोन आरोपींनी हत्येमागील कारणांचा खुलासा केल्याचे वृत्तवाहिनीने नमूद केले आहे.

या प्रकरणात आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे की, आरोपींनी संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे १५ व्हिडीओ आणि ८ फोटो स्वतःच्या मोबाईलमध्ये चित्रित केले होते. या व्हिडीओनुसार, ९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजून ४६ मिनिटांनी आरोपींनी देशमुख यांच्यावर हल्ला सुरू केला होता.

या घटनेनंतर चार महिने उलटूनही संपूर्ण सत्य समोर येण्यासाठी देशमुख कुटुंबीयांना आणि समर्थकांना मोठा संघर्ष करावा लागला. सुदर्शन घुले याच्या कबुलीजबाबाने या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली आहे.

त्यांनी म्हटले की, या हत्येतील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा मिळेपर्यंत आम्ही समाधानी होणार नाही. तसेच, अद्याप फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे याला तातडीने अटक करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. हा कबुलीजबाब आणि त्यानंतरची माहिती यामुळे बीडमधील या हत्याकांडाचा तपास आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपला असल्याचे दिसत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe